Friday, 4 December 2020

कुमुदिनी

 २९/११/२०२०


आज वेताळ टेकडीच्या खाणीमध्ये गेलो होतो. खाणीत उतरायची ही दुसरीच वेळ, मागच्या वेळी येवढं पाणी नव्हतं. यावर्षी खुप छान पाऊस झालाय ! 

खाणीवर गेल्या गेल्या आकारामुळे पटकन लक्ष गेलं ते एकमेवं आलेल्या water lilly कडे. 

इतर जलवनस्पती न्याहाळताना, पाणलवंग, नालबी तर आतापर्यंत ओळखीच्या झाल्याने पटकन ओळखता आल्या, पण कमळ किंवा लिलीप्रमाने पसरट पान असलेली एक नवीन (माझ्याकरता) जलवनस्पती सुद्धा दिसली. फुलं लांबुन खुप छोटी दिसत होती. 


एका ठिकाणी काठाला लागुन आली होती, त्यामुळे रुप, रंग आणि आकार जवळुन बघता आला. 






सुंदर आणि शुभ्र, बारीकसं एक ते दिड से.मी ची फुलं , आणि बदामासारखं पसरट पान. 




सवयीप्रमाणे नावं शोधलं

 मराठी नाव - कुमुदिनी-

Common name: Crested Floatingheart 

अधिक माहितीसाठी:

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Crested%20Floatingheart.html#:~:text=Nymphoides%20hydrophylla%20%2D%20Crested%20Floatingheart&text=Crested%20Floatingheart%20is%20an%20aquatic,Leaves%20few%20per%20node.





 पानाखाली कंद म्हणजे छोटया केळ्यासारखे (वेलची केळी नाही पण खरोखरच्या वेलची येवढे  ☺ ) घड असतात असं वाचलं. 

 




खाणीत कुमुदिनीचं प्रमाण जास्त असलं तरिही, ही आपल्या कडची स्थानिक जल वनस्पती आहे. त्यामुळे ती water hyacinth सारखी फोफावली/पसरली नाही सगळीकडे.  नाहीतर पाण्यात वाढणार्‍या अस्थानिक जलवनस्पती असतील तर, त्यांच्यामुळे मोठी हानी होते आजुबाजुच्या सगळ्याच परिसरावर हे शिकतोय सध्या Ecology मध्ये.. 


अस्थानिक जल वनस्पती फोफावल्यावर पाण्यातल्या dissolved oxygen च प्रमाण कमी होतं , पुनरुत्पादन खुप वेगात होते, त्यांची चादर पसरली जाते पाण्यावर, त्यामुळे सुर्याचा प्रकाश तळापर्यंत म्हणजे आतल्या इतर जीवसॄष्टीपर्यंत पोहोचु शकत नाही, पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होतो. अंततः ह्या चादरीचा जीवनकाळ संपल्यावर त्याच पाण्यात कुजुल्यांमुळे खुप जास्त प्रमाणात दुर्गंधी पसरते.. तिथली स्थानिक जीवस्त्रुष्टी नाश पावते. . . 


आपली हिच कुमुदिनी युरोपात त्रासदायक झालीये. आणि Amazon च्या water hycinth ने नैसर्गीक शत्रुच्या अभावामुळे आपल्या पाण्याला दुषीत केलयं. 


आमच्या म्हतोबा टेकडीवरुन पाषाणचा तलाव छान दिसायचा पुर्वी, पण आता water hycinth वाढल्यामुळे तलाव म्हणजे, खेळाचं ग्राउंड वाटतयं टेकडीवरुन!




Tuesday, 1 December 2020

वेताळाची खाण



काल आम्ही खाणीत दुसर्‍यांदा खाली उतरलो.  खाणीत उतरलो खरे पण खुप गर्दी दिसली, आम्हीपण गर्दीचा भाग होतोच खरं.  पण आम्ही फक्त पक्षी आणि पाण्यातली स्रुष्टी न्याहाळायला आलो होतो. आणि आमच्या सोबत होते कॅमेरा घेऊन आलेले, शांतपणे निरीक्षण करणारे पक्षीप्रेमी, (कारण हा काळ पक्षी निरीक्षणासाठी चांगला, खाणीत ह्या महीन्यांमध्ये  स्थानिक व स्थलांतरीत असे खुप पक्षी दिसतात.), कुत्र्यांना पाण्यात खेळवण्यासाठी घेऊन आलेले पुणेकर (ह्यांची गर्दी जरा जास्तच होती) , गप्पा मारत बसलेले तरुण आणि तरुणी, पाणी प्यायला आलेल्या गाया आणि बैल आणि पाण्याच्या पलीकडे मोठ्या कष्ठाने कडा उतरण्याचा सराव करत असलेली कॉलेजची शिकलेली मुले,  जी खाली उतरुन दंगा करत होती, आणि पाण्यात भाकर्या काढत होती. अर्थात पाण्यात भाकरी काढणे हा मुलांचा आवडता खेळ. लहानपणी बर्‍याच जणांनी तो खेळलाही असेल. त्यामुळे काहींना ते फार वावग नाही वाटणार, पण खाणीतल्या पक्ष्यांसाठी, तीथल्या wetland  ह्या ecosystem साठी हे कुत्र्यांना पाण्यात खेळवणं, दगडी मारणं हे अपायकारक वाटलं.  आणि काल हेही ऐकण्यात आलं, की लोकं गळ घालून बसतात मासे पकडण्यासाठी...


कास पठारावर कसं कुंपण घातलयं , एक सीमा रेषा आहे , सेक्युरीटी आहे, रेषेच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, तसं करायला हवंय आपल्या खाणीचं असं वाटतं. ज्यामुळे हा भुभाग आपल्या सारख्या महाभागापासुन संरक्षीत राहील.  



Monday, 30 November 2020

पान लवंग!

 आपल्या स्विमिंग पुलच्या भागात जिथे बसायची जागा आहे ना,  तीथे रेलींगला लागुन अनेकदा पिंपळाच झाड उगवुन येताना पाहिलंय, पण यंदाच्या पावसाळ्यात एक वेगळंच लालसर रोपं मी रोज पहात होते, क्लब हाऊस कोविड मुळे बंद असल्याकारणामुळे वर जाऊन हे रोपटं काही बघता नाही आलं बरेच महिने, 


पण एका कामानिमीत्त आत गेलो तेंव्हा ह्याला नीट निरखुन पाहिलं, आणि पोट्भर फोटो पण घेतले. हे रोपटं तोपर्यंत बरच वाढलं होतं कोणत्या पक्ष्याचं काम असावं बरं हे????

अगदी बारीक आणि नाजुक पिवळसर फुलं होती आणि लवंगासारखी फळं होती. 












आणि आजुबाजुला अजुन बरीच पिल्लं पण होती ह्याच्या सारखीच, 








गुगल आणि फ्लॉवरस ऑफ इंडीया च्या सहाय्याने कळलं की ही एक पान वनस्पती आहे. नाव आहे पान लवंग! साचलेल्या पाण्यात किंवा पानथळ ठिकाणीच उगवते. 



or may be this one:
http://tropical.theferns.info/viewtropical.php?id=Ludwigia+erecta



हे वाचुन खुप आश्चर्य वाटलं. पाणी काय मातीचा अंश नव्हता ह्या रेलींग च्या आजुबाजुला, उन्हाने तळपत होतं हे रेलींग. तरी कशी काय बरं ही पान वनस्पती???? कि पाणी मुरतंय कुठुनतरी जे मला दिसत नाहीये???





29/11/20

पण आज खात्री पटली!  वेताळ टेकडीवर गेलो होतो तेंव्हा तिथल्या खाणीतील पानथळ जागेत काठाकठाने पानलवंग आलेली पाहीली आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला मिळालं की ही पाण्यातच वाढणारी वनस्पती आहे. इथल्या पाण्यात ती उंचच उंच म्हणजे जवळजवळ ६-७ फ़ुटांपर्यंत अगदी ताठ  वाढलेली दिसली.















Wednesday, 18 November 2020

पांढरफळी


13/09/2020

मराठी नाव: पांढरफळी, 


Common name: Common Bushweed


Botanical name: Flueggea leucopyrus wild / Spinous fluggea


http://www.flowersofindia.net/catalog/slides/Bushweed.html#:~:text=Flueggea%20leucopyrus%20%2D%20Bushweed&text=Bushweed%20is%20an%20erect%20shrub,2%2D8%20mm%2C%20grooved.



आज  खुप सुंदर झुडुप पाहिल टेकडीवर.............

पांढरफळी, आवळा कुळातील हे जंगली झुडुप आहे.





एका फांदीला अतीशय  छोटीशी कळी/फुल दिसत आहे!
13/09/2020





पांढरफळीच्या झाडावर दिसलेली जैवविवीधता:

Plant hopper







फांद्या सुरु होण्यापुर्वीचा खोडाचा भाग असा काटेरी आहे .








15/11/2020









ही झुडुपे सहसा विभक्तलिंगी असतात (Dioecious plants) . म्हणजे पपईच्या झाडाप्रमाने ह्या झुडुपांना फक्त नर किंवा स्री फुलेच लागतात.

आपल्या टेकडीवरील हे झुडुप खुप औषधी आहे. 

 फुलं फळ लागण्याचा कालावधी जुलै /ऑगस्ट पासुन सुरु होतो.

फळं सुरवातीला हिरवी असतात, व पक्व झाल्यावर पांढरी होतात, म्हणुन पांढरफळी.....





Monday, 16 November 2020

नालबी/ shola


 १५/११/२०२०


common name: Indian jointvetch, kat sola,


मराठी : नालबी


Botanical name:  Aeschynomene indica


आधिक माहिती साठी:


http://www.flowersofindia.net/catalog/slides/Indian%20Joint%20Vetch.html#:~:text=Aeschynomene%20indica%20%2D%20Indian%20Joint%20Vetch&text=Indian%20Joint%20Vetch%20is%20an,hairs%20on%20stems%2C%20and%20stalks.&text=Flowers%20stalks%20have%202%20bracteoles,long%2C%20pea%2Dflower%20shaped



Seed plant herb.



आपल्या टेकडीवर काहीच भागांमध्ये दाटीवाटीने पसरलेल्या द्विदल वनस्पतीचा  हा प्रकार. सप्टेंबर मध्ये म्हणजे पावसाळ्यात  आपल्या टेकडीवर आढळला (यंदा पाऊस ऑगस्ट मध्ये सुरु झाला). 






पावसाळ्यात पाहिलेली नालबी
 

ऑक्टोबर/नोव्हेंबर मध्ये ह्याला मिकीमाऊस सारखी सुंदर फ़ुले आणि नक्षीदार शेंगा लागल्या. 











 शेंगांचा आकार असा सुंदर नक्षीदार आहे .




The larvae in This photo is pod borer, may be Helicoverpa armigra


ह्याच्याबद्दल अधिक माहिती वाचली. हे तृण पाणथळ किंवा पाण्याचा निचरा न होणार्‍या ठिकाणी आढळते.  

बर्‍याच ठिकाणी ह्याचा वापर मात्र वेगवेगळा केलाय माणसाने!

 हिंदी /बंगाली भाषेत ह्याला शोला म्हणतात. ह्या तृणाचे वाळके खोड (भेंड) फोम प्रमाणे असते, त्यामुळे भेंडापासुन वेगवेगळ्या वस्तुंना आकार देऊ शकतो. बंगाली रीति रिवाजात तर नवरदेवाचा मुकुट ह्या शोलाच्या भेंडापासुन बनवतात. शोलाच्या हॅटस व अनेक कलाकुसर असलेल्या वस्तु बनवता येतात.

https://www.wikiwand.com/en/Sholapith#/overview


कोइंबतुर मध्ये मुद्दामहुन ह्याची लागवड केली जाते अस वाचलं, पण कारण स्पष्ट लिहिले नव्हते. 

नालबी / शोला हे द्विदल तृण आहे. त्यामुळे इतर द्विदल धान्यांप्रमाणे ह्याच्या मुळांवर तर रायझोबियमच्या गाठी असतात, पण ह्या गाठी ह्याच्या खोडावर सुद्धा दिसतात. ह्या  गाठींमधले Bradyrhizobium हे जीवाणु जरा वेगळे आहेत, जे नायट्रोजन स्थिरिकरण करतात,  व प्रकाश संश्लेषणही करु शकतात.  हिरवळीच्या खतासाठी ह्याचा वापर करतात.

 बर्‍याच ठिकाणी गुरांकरिता ह्याचा चारा म्हणुन उपयोग करतात, पण ह्याच्या बिया विषारी असल्यामुळे काही प्राण्यांना ते अपायकारक आहे, त्यामुळे काही ठिकाणी ह्याचा वापर टाळतात.


पश्चिम महाराष्ट्रात ह्याच्या पानांचा जेवणात उपयोग होतो, स्थानिक भाषेत ह्याला रानपोकळा असेही म्हणतात.

जंगलाचे पाऊस ,  भुरूपे, पृथ्वीवरील त्याच्या ठिकाणांवरुन अनेक प्रकार बनले आहेत, हे सध्या Ecology मध्ये शिकत आहोत.

एकंदरीत आपली टेकडी ही शुष्क पानझडी जंगलात (Dry Deciduous forest)  मोडते, पण तरीही पाणथळी /दलदली जंगलांचे (marshy forest) काही भाग  (patches) इथेही आहे असे दिसते.



29/11/2020

आज वेताळ टेकडीवर गेलो होतो तेंव्हा तिथल्या खाणीतील पानथळ जागेत  नालबी पाहीली . दलदलीच्या ठिकाणी वाढते हे वाचलेले सिद्ध झाले. पण म्हातोबा टेकडीवर जशी दाटीवाटीने वाढलेली दिसली तशी इथे दिसली नाही. 











वेताळ टेकडीच्या खाणीत पाहिलेली नालबी.



Thursday, 29 October 2020

भु-तेरडा

 भु- तेरडा, भु-गेंद


Common name: Crested Lepidagathis


Botanical name: Lepidagathis cristata 


http://www.flowersofindia.net/catalog/slides/Crested%20Lepidagathis.html


जीज्ञासा जवळच्या म्हातोबा टेकडीच्या पायथ्याशी जास्त वृक्ष नाहीत. नवरात्रादरम्यान इथे गवताची विवीध रंगांची फुले उमलतात. आमच्या ecology च्या शाळेत  शिकलो ह्या अश्याप्रकारच्या जमिनी हि मुळची वृक्ष तोड झाल्याने पडीक (wasteland) झाल्या आहेत. जमिनीची धुप होऊन बर्याच ठिकाणी कातळ उघडा पडला आहे. ह्या कातळातुन सुद्धा आकर्षक अशी छोटी छोटी फुलं उमलतात. अश्याच फुलोर्‍यातला एक प्रकार आहे हा भु-तेरडा. किंवा भु-गेंद...



हा भु-तेरडा यंदाच्या पावसाळ्यात शिक्षकनगर हुन म्हातोबा टेकडीवर जाताना वाटेत दिसला.


पावसाळ्यात ह्या पडिक जमिनीवर एखादा काटेरी/केसाळ गोळा ठेवल्याप्रमाने वाटावा असा दिसतो भु-तेरडा. जमिनीला लागुनच असलेल्या काटेरी/केसाळ गोळयातुन बारीक फांद्या  फुटतात, आणि ह्या गोळ्यातच बारिकशी पांढरट-गुलाबीसर फुलं फुलतात..



भु-तेरडा ही एक खुप औषधी वनस्पती आहे, तापावर आणि त्वचेची आग थांबवण्यासाठी हिच्या पासुन औषधं बनवतात.


भु-तेरड्याचे निसर्गात खुप सुंदर असे सहजीवन दिसते. उन्हाळ्यामध्ये भु-तेरड्याची फुलं आणि पानं सुकुन जातात आणि तरिही ह्या कोरड्या जमिनीवर भु-तेरड्याचा गोळा आपलं अस्तित्व टिकवुन असतो. टिटवी ह्या पक्ष्याचा वीणीचा हंगाम  उन्हाळ्यातच असतो.  टिटवी ही तीची अंडी जमिनीवरच ह्या भु-तेरड्याच्या जवळ घालते. तीची अंडी आजुबाजुच्या परिसराशी समरुप झालेली असतातच. पण अंड्यातुन बाहेर आलेल्या पिल्याचा आकार आणि रंग पण हुबेहुब  भु-तेरड्या सारखाच  दिसतो. त्यामुळे शिकारी प्राणी/पक्ष्यांची फसगत होते व भु-तेरड्यामुळे पिल्लांच संरक्षण होतं.


Sunday, 25 October 2020

अजब कोश

 २५/१०/२०२०


आज टेकडीवर एक अजब कोश पाहिला. गवताच्या काडीवर फोम प्रमाने दिसणारा एक सछिद्र कोश!



गुगल बाबाच्या मते हा कोश नव्हे हे एक प्रकारचे अंडकवच  (mantis ootheca/egg case) आहे. आणि ते आहे खंडोबाच्या घोड्याचं! (Praying Mantis) ,  घरी झुरळांच्या अंड्यांचे कोश पाहीले आहेत अनेकदा, पण हे खुपच मोठं होतं, म्हणजे साधारण 40 मि.मि च असावं.


इंटरनेटच्या काही पानांवर ह्याप्रमाने दिसणार्‍या नाकतोड्यांच्या अंड कवचांचेही (egg case) फोटो पाहिले आहेत. आणि आपल्या टेकडीवरील नाकतोड्यांची संख्या व त्यांच्या विवीध जाती बघता ही शक्यता नाकारता येत नाही.

 किटकतज्ञांंनी  हे काय आहे ते ओळखण्यासाठी मदत करावी.


किटकांमध्ये हे दोन मुख्य फरक जाणवले.. काही किटकांच्या जीवनक्रमात अळया ह्या अंड फोडुन बाहेर येतात. ह्या खादाड अळया त्यांच्या जीवन क्रमातील दुसरी पायरी ओलांडण्यापुर्वी स्वतःच स्वतःभोवती कोश गुंडाळुन घेतात. आणि दुसर्या प्रकारामध्ये किटकाची मादीच पिल्लांसाठी हा कोश बांधुन देते.  पिल्लांना बाहेर आल्यावर जीथेअन्न मिळेल अश्या ठिकाणी ही मादी फोम प्रमाने दिसणारे कवच तयार करते. व ह्या कवचामध्ये ती शेकडोंनी अंडी घालते. हे कवच सुरवातीला मऊ असते पण नंतर त्यात असलेल्या tanning agents मुळे कठीण बनत जाते. ह्या मुळे आतील पिल्लांना परजीवी माश्या (like Parasitoid wasps)  व इतर भक्षक यांपासुन संरक्षण मिळते. आणि ह्या कोशातील अंडी उबुन एक दिवस अनेक जीव (अजून पंख नसलेले nymph) बाहेर पडतात.


येवढा चोख बंदोबस्त असुनही, फोटोत ह्या कोशावर एक माशी (wasp) दिसत आहे. 





ही माशी आहे Podagrion Mantis Parasitic Wasp.  ही एक अतिशय छोटीशी २ मी.मी परजीवी माशी आहे. ही माशी खंडोबाच्या घोड्याच्या मादीवर सवार होऊन येते. नंतर तिने बनवलेल्या ओल्या कोशात तीचा डंख (Ovipositor) रोवुन अंडी घालते. आणि ह्या माशीची अंडी फुटुन बाहेर पडलेल्या अळया खंडोबाच्या किड्यांची अंडी फस्त करतात. आणि नवजात परपोशी माश्या कोशातुन बाहेर पडतात.

https://indiabiodiversity.org/observation/show/1822696?fbclid=IwAR2SUD_IbJPKP2tm0CBKwLo_nnbPlMhCgDSUYHPAPz1QgKlK0XBi9k2jjxI

किटकांमद्धे खंडोबाचा घोडा हा नंबर एकचा शिकारी कीटक आहे, जे काही हलत ते  सगळंच म्हणजे स्वतःच्या च जातीतील किंवा इतर कीटकही तो शिकार करून फस्त करतो. म्हणून परदेशात आणि भारतातही गार्डन आणि शेती मध्ये पाळून (pet mantis) पेस्ट कॅट्रोल म्हणून ह्यांचा वापर माणसाने केला आहे.
आणि ह्यांची मादी एका वेळेस 400 अंडी घालणार असेल तर ह्या जगात एकही कीटक जिवंत राहणार नाही..म्हणून  ह्या परपोशी माश्यांची सोय निसर्गाने केली असावी.