Tuesday 18 August 2020

पावसाळ्यात म्हातोबावर दिसलेली आळंबी

 १६/०८/२०२०

यावर्षी जरा उशीराच , म्हणजे ऑगस्ट महिन्यात पावसाने जोर धरला. आता ऊन पावसाचा खेळ सुरु झाला होता. बर्‍याच दिवसांनी आम्ही म्हातोबावर गेलो. टेकडीच्या जमिनीवर अळंबीचं साम्राज्य पसरलं होतं. 

पालापाचोळा कुजवण्याचं आणि टेकडी स्वच्छ ठेवण्याचं काम जोरदार चालू होतं. 

प्राण्यांचे चयापचय (metabolism) त्यांच्या शरीराच्या आत घडते. बुरशीजन्य परिवारात चयापचय शरीराच्या बाहेर घडते. 

कवक/बुरशी ही खूप नाजूक मृतोपजीवी (saprophytic) आहे. वातावरणात बुरशीचे असंख्य बीजाणू असतात. त्यातले काहीच योग्य ठिकाणी म्हणजे जंगलात पडलेली पानगळ, पडलेल्या फांद्या, मेलेली झाडे व प्राणी, यावर पडले की तिथे कवक रुजते, तिथेच जमिनीखाली तिच्या कवकतंतूंचं जाळं पसरतं, जे आपल्याला दिसून येत नाही. या ठिकाणी बुरशी समुहाकडून काही पाचक रस (digestive enzymes) बाहेर सोडले जातात, व कुजणार्‍या मृत जीवांमध्ये असलेल्या प्रथिनांच (nutrients) विघटन (decompose)  करुन नायट्रोजन, फॉस्फरस हे विद्राव्य (soluble nutrients) स्वरुपात मुक्त होतात. हे अन्न बुरशीला वापरता येतंच पण पाण्यात विरघळत असल्यामुळे जवळपास असलेल्या झाडांनासुद्धा त्यांच्या मुळांद्वारे शोषता येते,  झाडांचंही पोषण होतं. जमिनीखाली असलेल्या ह्या स्वयंपाकघरात सुग्रास भोजन बनवले जाते. ज्याचा लाभ झाडे, कीटक, मुंग्या आणि प्राण्यांना पण होतो . Nutrient Cycling मुळे बुरशी, झाडे आणि प्राणी यांचं एकमेकांवर अवलंबून असलेलं सहजीवन जंगलात अखंड चालुच राहतं. मग ह्याना मृतोपजीवी म्हणावं कि सहजीवी हा प्रश्न पडतो. कुजण्यास सोप्या असणार्‍या सेंद्रीय पदार्थांचे विघटन जीवाणूंमार्फतपण होतं, पण कुजण्यास कठीण असलेल्या मृत सेंद्रीय पदार्थांच्या विघटनाचं काम कवकं करतात. 




आळंबी पावसाळी वातावरणात येते. आळंबी हे कवकाचे फळ आहे, व ते फक्त बीजाणूंचा प्रसार करण्याकरता काही तासांसाठी कवकतंतूंतून बाहेर येते. आळंबीच्या छत्रीखाली माश्याच्या कल्ल्याप्रमाणे (gills) रचना असते, जिथे बीजाणू पक्व होऊन बाहेर पडतात. अतिसूक्ष्म असल्यामुळे हे असंख्य बीजाणू हवेतून वातावरणात पसरतात. बीजाणू पक्व होऊन हवेत पसरल्यावर आळंबी गळून पडते.  ती ज्या कवकतंतूमधून फळाला येते, त्या कवकतंतूंचं जाळं मात्र जमिनीखाली जिवंत राहतं, व त्यानंतरही बराच काळ झाडांच्या मुळांसोबत अन्नाची देवाणघेवाण करत सहजीवन जगू शकते . युरोपातील बेल्जियममध्ये honey fungus (Armillaria) ह्या जातीच्या कवकाचं जाळं ३/४ कि.मी लांब पसरलेलं असतं. ह्या कवकाला सगळ्यात जास्त काळ जगणारा जीव म्हणावा लागेल. म्हणजे अगदी देवमासा(व्हेल) आणि कासवाच्या जातीपेक्षा जास्त काळ जिवंत राहु शकणारा. ह्या कवकांचे जाळे सुमारे २००० वर्षांपासून जिवंत आहे. 

बुरशीच्या बर्‍याच जाती आहेत. जसं जंगलात विविध रंगाची फुलं असतात, तश्याच खूप रंगांच्या, आकारांच्या अद्भुत आळंब्या पण आढळून येतात. त्यांच्या वाढीप्रमाणे त्याचा आकार आणि रंग ह्यात बदल होत राहतो. 

कीटक किंवा प्राणी काही प्रकारच्या वन्य आळंबी खातात. जंगलाच्या जवळपास रहाणारे आदिवासी, गावकरी ह्यांनी आळंबीचं ज्ञान जतन करुन ठेवलं आहे. आळंबीचा वापर ते बर्‍याच औषधांसाठी आणि अन्नासाठी करतात. काही आळंबी ह्या विषारी असतात, तर काही योग्य प्रकारे शिजवूनच (with detoxification)  खाण्यायोग्य बनवता येतात. आळंबींची पूर्ण माहिती आणि आपल्याला त्याची allergy नाही ह्याची खात्री असल्याशिवाय त्या खाऊ नये. 

एखाद्या जंगलाचा पोत हा तिथे आढळणार्‍या आळंबीवरुन पण ठरवता येऊ शकतो. आम्हाला म्हातोबावर आढळलेल्या आळंबींच्या काही जाती इथे नोंद करुन ठेवणार आहोत. 

१. बहुतेक Pholiota flammans:


घायपाताच्या झाडाजवळ ही आळंबी दिसली, सोन कसं पिवळंधमक असतं, तशीच ही अळंबी तेजस्वी दिसत होती. अगदी सोनसावरीच्या फ़ुलासारखी पिवळीधमक. अश्याप्रकारची आळंबी पहिल्यांदाच बघीतली. ३ -४ ठिकाणी एक एकटी आलेली दिसली. छत्रीच्या टोपीवर आणि देठावर दोन्ही ठिकाणी आळंबीवर केस होते आणि तिचा पिवळा रंग थोडा झडून खाली पडलेला दिसला.


बाजूलाच ह्यांच्यासारखी पण फिकट रंगाची छोटी आळंबी दिसली.

Date:  23/08/2020

2. Cyathus Olla/ bird's nest fungus  :


मराठी नाव :  ??  सापडलं नाही आपणच द्यायचं का????


आज खुप मजेशीर कवक बघितलं. शर्ट च्या बटनापेक्षा आकाराने छोटं. म्हातोबा टेकडीवरची सगळी ग्लिरिसिडिया १/२ वर्षांपुर्वीच जेसीपीने काढुन टाकली होती, त्यामुळे वरच्या भागात खुप मोकळं रान झालं होतं. आणि ह्या कुजत पडलेल्या लाकडांवर पावसाळ्यांत कवकाचा खजिना सापडला.  एखाद्या घरट्यामध्ये पक्ष्यांनी अंडी घालावी त्याप्रमाने दिसत होती हि अळंबी. म्हणुनच हिला  bird's nest fungus असं पण संबोधलं जात, ही अंडीच (peridioles) असतात पण कवकांची, पक्ष्यांची नाही.  :-)

ह्या अळंबीची रचना एखाद्या नरसाळ्यासारखी असते. आणी तिची अंडी (peridioles)  नरसाळ्याला घट्ट चिकटलेली असतात. ही विशीष्ट रचना पाण्याचा थेंब ह्यात पडुन ही अंडी फुटण्याकरता केलेली आहे. बिजाणु पक्व झाल्यावर आणि पाण्याचा थेंब ह्यात पडल्यावर अंडी फुटुन त्यातील बिजाणु वातावरणात सर्वत्र पसरले जातात.


3. Clavulina cristata:

ग्लिरिसिडिया झाडाखाली भरपुर पसरलेली दिसली


https://www.mushroomexpert.com/clavulina_cristata.html





2.  Marasmius siccus/ orange-pinwheel-marasmius



ह्या प्रकारची आळंबी आमच्या गार्डनमध्येपण आढळली होती. 


3. Psilocybin mushroom  /   magic mushrooms  ??????  ?????



आळंबींचे फोटो काढण्याचा ही आमची पहिलीच वेळ होती, यातून आम्ही बरंच काही शिकलो. जर आळंबीची ओळख करुन घ्यायची असेल तर आळंबीच्या कल्ल्यांचा, देठाचा, आकारासाठी रुपयाचा वापर करुन फोटो घ्यावा लागेल. आळंबीच्या विविध जातींमध्ये  खूप साधर्म्य असू शकतं.  काही तासातच अळंबी पक्व होते त्यामुळे तिच्या आकारात आणि रंगात पण फरक होत रहातो.  

त्यामुळे त्यांची ओळख होण्यासाठी अजून फार लांबचा पल्ला आहे.  :-)


4.????????????????

याची नीटशी ओळख पटली नाही.

पण त्यांच्या कल्ल्यांवर लहान मुंग्या आणि कीटक त्यांचं अन्न मिळवण्यासाठी जमा झालेले दिसले.


5. Puffball mushroom


टेनिस बॉल पेक्षा थोडी आकाराने मोठी असलेली आळंबी रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली,


तिच्या बाजूलाच ही अजून एक आळंबी दिसली. कदाचित हा त्या पफबॉलचाच बेस असावा, किंवा कोणाच्या तरी पायाखाली चिरडली गेलेली अजून एक वेगळी आळंबी असू शकते. पण म्हातोबाच्या मोठ्या पायवाटेवर ती कुठून आली असेल? किंवा कोणीतरी ती तिथे फेकली असावी.

6. ?????????????????????




7. ???????????????????



Sunday 16 August 2020

Hammer Headed Flatworm (Bipalium)

खूप दिवसांनी आज टेकडीवर जायची संधी मिळाली. आम्हाला हा गांडुळासारखा प्राणी दिसला आज टेकडीवर. 

चार एक इंचांची लांबी असणारा हा जीव अगदी निरुपद्रवी वाटला बघताना. पण जसजशी त्याच्याविषयी माहिती मिळत गेली तशी मी थक्क झाले. निसर्गामध्ये काय काय घडत असतं, ते आपल्या कल्पनेच्याही पलिकडचं आहे.

अंधार्‍या दमट ओलसर जागेत रहायला यांना आवडतं. खूप पाऊस झाल्यावर ते कधीकधी बाहेर मातीमध्ये दिसतात. ते निशाचर आहेत, क्वचित सकाळच्या वेळीही दिसतात. गोगलगाय, शेमडी(slug) यांच्यासारख्या चिकट खुणा हेही मागे ठेवतात.

यांचं भक्ष्य म्हणजे गांडुळे, शेमडी यासारखे जीव. आकाराने आपल्याएवढं मोठं गांडूळ सुद्धा ते आरामात धरतात. आपल्या भक्ष्याला विळखा घातल्यावर ते घश्याचा भाग बाहेर काढून भक्ष्यावर पाचक रस टाकतात, त्यामुळे भक्ष्याचे बाहेरच पचन होऊन ते विरघळायला सुरुवात होते. हा रस मग ते गिळतात. 

नर आणि मादीच्या मीलनातून याचे लैंगिक पुनरुत्पादन होऊ शकतंच, पण काही वेळा हे त्यांच्या शेपटीचा भाग कुठेतरी अडकवून स्वतःचं शरीर ताणत राहतात. शेपटीकडचा भाग शेवटी तुटतो, त्यातून नवा जीव तयार होतो. वर्षाला दोन – तीन वेळा ते असं पुनरुत्पादन करू शकतात.     

आशिया खंडाबाहेर या प्राण्याकडे त्रासदायक invasive species म्हणून बघितलं जातं. कारण शेती, कम्पोस्टिंग, बागकामात मदत करणार्‍या गांडुळांचा हा मोठा शत्रू आहे.

पक्षी, सरडे किंवा दुसरे कुठले जीव यांच्या वाटेला जात नाहीत. मग यांची संख्या मर्यादित कशी राहते? तर एक हॅमर हेडेड फ्लॅटवर्म दुसर्‍यालाही असा खाऊन टाकतो!


Tuesday 11 August 2020

केना

केन्याची (Commelina benghalensis) फुलं टेकडीवर दर पावसाळ्यात दिसतातच, अणि दर पावसाळ्यात त्या फुलांचा न चुकता फोटो काढला जातोच! 

शेतीच्या शाळेत केन्याची पहिल्यांदा जवळून गाठ पडली. कुठल्याही शेतकर्‍याला विचारा ... शेतात केना म्हणजे त्याच्यासाठी मोठं संकट. वेड्यासारखा पसरतो तो. प्रत्येक पेरातून उगवून येतो, बियांमधूनही येतो, आणि मुळांनाही रनर्स असतातच. त्यामुळे शेतातला केना म्हणजे उपटून दूर टाकून नष्ट करण्य़ाची गोष्ट. त्याच्यावरचा इलाज काही सापडला नव्हता. केना फार वाढण्यापूर्वीच शेतातून काढून टाकायचा हेच ऐकायला – वाचायला मिळालं सगळीकडे. 

शेतातल्या केन्याविषयी मागच्या वेळी लिहिलं तेंव्हा समजलं, की केन्याची भजी आणि भाजीपण खातात. यंदा लॉकडाऊनमुळे सोसायटीच्या बागेत बरंच तण माजलंय, त्यात केनाही फोफावलेला सापडला. त्याची भाजी करून बघावी म्हणून थोडी कोवळी पानं घेतली. 


मुगाची डाळ, कांदा घालून केन्याची कोवळी पानं आणि देठ यांची भाजी केली, ती इतकी सुरेख लागली! 


आता वाटतंय, शेतात आपोआप येणारा बहुगुणी केना उपटून टाकून भाजीची लागवड करणं म्हणजे वेडेपणा आहे. धो धो पावसात सगळ्या पालेभाज्या जमीनदोस्त होतात तेंव्हाही हा जमिनीचा दोस्त टिकून राहतो, मस्त पसरतो. त्याच्या मुळांवरच्या गाठींमुळे जमिनीतल्या नत्राचं प्रमाण वाढतं, जमीन सुपीक होते. गुरं केना खातात, केन्याने दूध वाढतं. त्याचे अनेक औषधी उपयोगही सांगितलेले आहेत. प्रमाणाबाहेर केना खाल्ला तर तो सारक आहे. 

एवढे सगळे गुण असणारा केना खाल्ला का जात नाही, विकला का जात नाही? त्याला भाव आला, तर शेतातला केना उपटून लांब कुठेतरी (तणनाशक मारून?) नष्ट करून दुसरं पीक घेण्याऐवजी एक पीक केन्याचं घेणं परवडेल. केना तण राहणार नाही, आणि त्याला संपवण्याची समस्याही उरायची नाही!    

केन्याविषयी अजून थोडी माहिती इथे, इथे आणि इथे सापडेल.