Sunday 16 August 2020

Hammer Headed Flatworm (Bipalium)

खूप दिवसांनी आज टेकडीवर जायची संधी मिळाली. आम्हाला हा गांडुळासारखा प्राणी दिसला आज टेकडीवर. 

चार एक इंचांची लांबी असणारा हा जीव अगदी निरुपद्रवी वाटला बघताना. पण जसजशी त्याच्याविषयी माहिती मिळत गेली तशी मी थक्क झाले. निसर्गामध्ये काय काय घडत असतं, ते आपल्या कल्पनेच्याही पलिकडचं आहे.

अंधार्‍या दमट ओलसर जागेत रहायला यांना आवडतं. खूप पाऊस झाल्यावर ते कधीकधी बाहेर मातीमध्ये दिसतात. ते निशाचर आहेत, क्वचित सकाळच्या वेळीही दिसतात. गोगलगाय, शेमडी(slug) यांच्यासारख्या चिकट खुणा हेही मागे ठेवतात.

यांचं भक्ष्य म्हणजे गांडुळे, शेमडी यासारखे जीव. आकाराने आपल्याएवढं मोठं गांडूळ सुद्धा ते आरामात धरतात. आपल्या भक्ष्याला विळखा घातल्यावर ते घश्याचा भाग बाहेर काढून भक्ष्यावर पाचक रस टाकतात, त्यामुळे भक्ष्याचे बाहेरच पचन होऊन ते विरघळायला सुरुवात होते. हा रस मग ते गिळतात. 

नर आणि मादीच्या मीलनातून याचे लैंगिक पुनरुत्पादन होऊ शकतंच, पण काही वेळा हे त्यांच्या शेपटीचा भाग कुठेतरी अडकवून स्वतःचं शरीर ताणत राहतात. शेपटीकडचा भाग शेवटी तुटतो, त्यातून नवा जीव तयार होतो. वर्षाला दोन – तीन वेळा ते असं पुनरुत्पादन करू शकतात.     

आशिया खंडाबाहेर या प्राण्याकडे त्रासदायक invasive species म्हणून बघितलं जातं. कारण शेती, कम्पोस्टिंग, बागकामात मदत करणार्‍या गांडुळांचा हा मोठा शत्रू आहे.

पक्षी, सरडे किंवा दुसरे कुठले जीव यांच्या वाटेला जात नाहीत. मग यांची संख्या मर्यादित कशी राहते? तर एक हॅमर हेडेड फ्लॅटवर्म दुसर्‍यालाही असा खाऊन टाकतो!


1 comment:

  1. ह्यांची digestive system खुपच मजेशीर आहे. तोंड आणि गुदद्वार एकाच ठिकाणी आहे

    ReplyDelete