Showing posts with label flora. Show all posts
Showing posts with label flora. Show all posts

Thursday, 10 June 2021

कांगुणी / माळकांगोणी - Celastrus paniculatus, black oil tree

 गणपतीमध्ये मैत्रिणीकडे कोकणात जी पत्री असते, त्यातली एक फार सुंदर होती. तिचं नाव काही माहित नव्हतं. पोपटी रंगाचे मण्यांसारखे घोस, पिकले की आत सहा शेंदरी लाल रंगाच्या बिया दिसायच्या. कितीतरी वेळा गणपतीनंतर या बिया रुजवायचा प्रयत्न केला पण त्या कधी रुजल्या नाहीत. नंतर समजलं, ही एका वेलाची फळं आहेत. वेलाचं नाव कांगुणी / माळकांगोणी - Celastrus paniculatus (black oil tree). संस्कृतमध्ये ज्योतीष्मती. आपल्याकडच्या जंगलांमध्ये ज्या मोठ्या वेली सापडतात – महालता – liana – त्यातली ही एक आहे. 

पोपटी – पिवळी फळं हळुहळू उकलतात


आणि मग लाल शेंदरी बिया दिसायला लागतात


नेहेमीपेक्षा वेगळ्या वाटेने `जिज्ञासा'जवळून मागच्या आठवड्यात टेकडीवर गेलो, तर वाटेत उजव्या हाताला एक मस्त दाटी दिसली - दहिवण, बारतोंडी, धावडा ही दाटीवाटीने आलेली झाडं आणि त्यांच्यावर चढलेला वेल. वेलाची पानं काहीशी चंदनासारखी वाटावीत अशी पण रुंद, आणि हिरव्या मण्यांचे घोस... काहीतरी वेगळं आणि सुंदर सापडलं होतं आज. शोधाशोध केल्यावर समजलं, ही माळकांगोणी आहे ... आपल्या टेकडीवर माळकांगोणी!

 



माळाकांगोणीची साल, पानं, बिया, बियांचे तेल या सगळ्याचे आयुर्वेदात अनेक उपयोग सांगितलेले आहेत. याची पानं गुरं खातात. पानझडी प्रकारची ही वेल आहे. पानं खूप वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात – गोलाकार, लंबगोलाकार, दातेरी कडेची, टोकदार. नर आणि मादी फुलं वेगवेगळी असतात, फांद्यांच्या टोकांवर बारीक हिरव्या फुलांचे घोस येतात.

टेकडीच्या नव्याने प्रेमात पडायला हे अजून एक कारण सापडलंय. अशा मोठ्या वेली सहजासहजी कुठेही आढळत नाहीत. त्यांचा भार झेपेल अशी झाडंही तिथे असावी लागतात. पूर्ण विकसित अवस्थेतल्या अशा पश्चिम घाटातल्या जंगलांचं हे वैशिष्ट्य समजलं जातं. त्यामुळे सहसा आपल्याला माणसाचा हस्तक्षेप नसणार्‍या देवरायांमध्येच महालता बघायला मिळतात. अमर्याद चराई, जळणासाठी होणारी वृक्षतोड, दर वर्षी रान जाळणं, उत्साही पण अनभिज्ञ टेकडीप्रेमांनी केलेली वृक्षलागवड, वनखात्याने केलेली वृक्षलागवड अशा सगळ्या ढवळाढवळीनंतरही आपल्या टेकडीवर अशी काही बेटं अजून शिल्लक आहेत हा केवढा मोठा दिलासा आहे!

 

https://vishwakosh.marathi.gov.in/16394/

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Black%20Oil%20Plant.html

https://en.wikipedia.org/wiki/Celastrus_paniculatus

Sunday, 25 April 2021

लघु अजान

 लघु अजान 


Ehretia aspera


म्हातोबा टेकडीवर मंदिराच्या पायथ्याशी आणि आमच्या सोसायटीच्या सिमेंटच्या भिंतीत हे झुडुप पहिल्यांदा पाहिलं.

झुडुपाकडे लक्ष जातं  जेंव्हा उन्हाळ्यात सुंदर अशी पांढरी फुलं गुच्छाने लागतात.

ह्याची पानं चामट व खरखरीत असतात, आणि जसजशी ती जुन होत जातात त्यांचा खरखरीत पणा वाढतच जातो.



मार्च / एप्रिल मध्ये उमलणारी फुले




मे- जुन मध्ये लागणारी फळे












जिज्ञासा टॆकडीवरील 5-6 foot उंच लघुअजान:








नंतर ते जिज्ञासा टॆकडीवर, उत्सव सभाग्रुहाच्या बाजुला असं बर्याच ठिकाणी दिसुन आलं, झाडं ओळखु आली कि ती ओळख आपणहुन देतात. तसच हे झुडूप नंतर बर्याच दुर्लक्षीत ठिकाणी आलेलं दिसलं.... नक्कीच कोणतातरी पक्षी ह्याच व्रुक्षारोपण करत असणार असं वाटतं.


हा लघुअजान म्हणजे अजान व्रुक्षाची छोटी आव्रुत्ती ....माझी मावशी वारकरी पंथातील होती, तीच्या मते ज्ञानेश्वरांनी त्यांच्या हातातली काठी आळंदीत जीथे रोवली तीथेच पुजनीय असा अजानव्रुक्ष जन्माला आला. जो आजही त्या ठिकाणी आहे.



महाजन सरांच्या  देशी  वॄक्ष ह्या पुस्तकात ह्या झाडाची छान माहीती आहे.


गंमत म्हणजे हा लघुअजान आमच्या सोसायटीच्या भिंतीत आला होता, जीथे त्याला छान फुलं/फळं येत होती. असंअसतानाही आम्हाला त्या झाडाची उगाच काळजी वाटु लागली, त्याला माती नसेल, कोणी पाणी घालत नाही ,....आणि मग ते झाड तिथुन उपटुन दुसर्या ठिकाणी हलवलं, आता हलवलेलं झुडुप सुकत चाललय. कदाचीत  पाऊस पडला तर परत वाढेल अशी आशा वाटते .. खुप वाईट वाटत होतं........ पण थोड्या दिवसांनी पाहिलं तर, जीथुन झाडं उपटलं होतं तीथे लघुअजान परत मुळातुन फुटला होता... ते बघुन  अपराधीपणा कमी झाला. 

सोसायटीच्या सिमेंटच्या भिंतीत आलेलं झाडं







आधी हिरवी / मग लाल चुटुक  होणारी फळं






उपटल्यावर मुळांच्या फुटव्यातुन पुनः आलेलं झुडुप



आईन-

 आईन-/ ऎन

Terminalia elliptica  

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Indian%20Laurel.html


आपल्या टेकडीवर आईनाची पुष्कळ झाडं आहेत.  टेकडीवरचं आवडतं झाडं , पावसाळ्यात तर  त्याच्या पानांना हात लावायचा  मोहच आवरत नाही.  कोवळ्या पानांचा भुभुच्या कानांसारखा अतीशय मऊ स्पर्श असतो. प्रतेक ॠतुत त्याचं  वेगळ रुप असतं..  पावसाळ्यातली मऊ पालवी, फुलं, हिवाळ्यात हिरवी चकचकीत पण कोमल फळं , हिवाळ्याच्या शेवटाला तपकिरी कडकडीत खाली पडलेल्या फळांचा सडा.. उन्हाळ्याच्या सुरवातीपासुन ते पावसाळ्यापर्यत सुंदर मोहर आणि फुलं......






पावसाळ्यात दिसणारी नविन रोपं, काही वर्षे जाळपोळ झाली नाही तर होतील ही पण मोठी......



म्हातोबाच्या मंदिराजवळच्या झाडाला असलेल्या वेगळ्याच लाल रंगाच्या कळ्या


फुलं/कळ्या



भुभुच्या कानासारखं मऊ मऊ पानं


लाल/ हिरवी कोवळी फळं





मगरीच्या पाठीसारखं खरखरीत खोडं

आईन हा काहीसा अर्जुनासारखा दिसणारा भाऊ, अर्जुन नदीकिनारी पाण्यात पाय घालुन बसणारा, आणि हा आपला, शुष्क कोरड्या टेकडीवर पण मजेत रहाणारा. दिसण्यात सारखेपणा असला तरी अंतरंगात फार बदल असेल का वेगवेगळ्या वातावरणाशी जुळवुन घेण्यासाठी............. म्हातोबा टेकडीवर अगदी सुखात नांदतोय कोणीही व्रुक्ष लागवड न करता त्याची नवी रोपं सुद्धा दिसतात जागोजगी........