Sunday 19 March 2017

महुआ महुआ महका महका ...

काल अचानक या झाडाने मोहात पाडलं ...


    नेहेमीची टेकडी, नेहेमीचीच पायवाट. तरीही तिथे नवं काहीतरी सापडत राहतं! आजुबाजूला बहर संपलेले भुंडे ग्लिरिसिडिया (गिरिपुष्प) आणि वाळलेलं गवत. याही झाडाखाली वाळालेल्या पानांचा खच, झाडावर एकही पान नाही. फक्त कळ्या. खाली झुकलेल्या या कळ्या कसल्या असतील म्हणून मी बघत होते, तर कुणीतरी खुडून तिथेच टाकलेल्या काही डहाळ्या दिसल्या.



दोन्ही डहाळ्यांवर एकेक फुललेलं फूल, बाकी अस्फुट कळ्या. फुलाचा वास बघितला, आणि उडालेच! हे मोहाचं फूल होतं.

मग अजून शोधल्यावर खाली पडलेल्या पानांमध्ये दडलेली अजून काही फुलं सापडली.  


अर्थातच हे फूल चाखून बघितलं. फुलात मध नाही, फुलालाच गुळमट गोड चव होती. (माऊला नाही आवडलं!) दोन फुलं खाल्ल्यावर दिवसभर मला आपल्या अंगाला मोहाच्या फुलांचा वास येतोय हे जाणवत होतं. :) (दिवसभर प्रचंड झोप पण येत होती - पण ती परवा रात्री नीट न झोपल्यामुळे असावी मोहाच्या फुलांमुळे नाही असं मी ठरवलंय. याची खात्री करायला आज परत दोन मोहाची फुलं खाल्लीत त्यामुळे परत एकदा महुआ महुआ महका महका :D)

***

काही झाडं संस्कृतीमध्ये अगदी खोल रुजलेली असतात, लोकांच्या जगण्याचा फार मोठा भाग त्यांनी व्यापलेला असतो. मोहाचं झाड अशा झाडांपैकी एक. मध्य भारतातल्या आदिवासी जीवनात मोहाचं खूप  मोठं स्थान आहे. मोहाची फुलं ते गोळा करतात, खातात, वाळवून त्या पिठाच्या भाकरी करतात, मोहाची दारू बनवतात. कविताताईंनी मोहाच्या पदार्थांविषयी - अगदी पुरणपोळीविषयीसुद्धा लिहिलं होतं त्यांच्या ‘घुमक्कडी’मध्ये. त्या पोस्टमध्येच पहिल्यांदा मोहाच्या फुलांचा फोटो बघितला त्यामुळे काल हे झाड ओळखता आलं. (मला तोवर उगाचच मोहाची फुलं लाल रंगाची असतील असं वाटत होतं.) यापूर्वी मोहाचं झाड पाहिलं होतं ते थंडीच्या दिवसत. तेंव्हा मोहाच्या बहराच्या काळ नसतो, त्यामुळे फुलं बघायला, चाखायला मिळाली नव्हती. सह्याद्रीमध्ये मोहाची झाडं फारशी नाहीत असा माझा समज. त्यामुळे पुण्यातल्या (माझ्या!) टेकडीवर मोहाचं झाड! खूशच झाले मी एकदम. अर्थात रानात या फुलांच्या स्वागताची जशी राजेशाही तयारी होते – झाडाखालची जमीन स्वच्छ करून, तिथे पंचा अंथरून त्यावर आदिवासी फुलं गोळा करतात – ते भाग्य पुण्यातल्या मोहाच्या झाडाला कसं लाभणार? शहरातल्या लोकांना हा मोह ओळखीचा नाही, त्यांना वेगळ्या मोहांच्या मागे धावायचं असतं!