Thursday 10 June 2021

कांगुणी / माळकांगोणी - Celastrus paniculatus, black oil tree

 गणपतीमध्ये मैत्रिणीकडे कोकणात जी पत्री असते, त्यातली एक फार सुंदर होती. तिचं नाव काही माहित नव्हतं. पोपटी रंगाचे मण्यांसारखे घोस, पिकले की आत सहा शेंदरी लाल रंगाच्या बिया दिसायच्या. कितीतरी वेळा गणपतीनंतर या बिया रुजवायचा प्रयत्न केला पण त्या कधी रुजल्या नाहीत. नंतर समजलं, ही एका वेलाची फळं आहेत. वेलाचं नाव कांगुणी / माळकांगोणी - Celastrus paniculatus (black oil tree). संस्कृतमध्ये ज्योतीष्मती. आपल्याकडच्या जंगलांमध्ये ज्या मोठ्या वेली सापडतात – महालता – liana – त्यातली ही एक आहे. 

पोपटी – पिवळी फळं हळुहळू उकलतात


आणि मग लाल शेंदरी बिया दिसायला लागतात


नेहेमीपेक्षा वेगळ्या वाटेने `जिज्ञासा'जवळून मागच्या आठवड्यात टेकडीवर गेलो, तर वाटेत उजव्या हाताला एक मस्त दाटी दिसली - दहिवण, बारतोंडी, धावडा ही दाटीवाटीने आलेली झाडं आणि त्यांच्यावर चढलेला वेल. वेलाची पानं काहीशी चंदनासारखी वाटावीत अशी पण रुंद, आणि हिरव्या मण्यांचे घोस... काहीतरी वेगळं आणि सुंदर सापडलं होतं आज. शोधाशोध केल्यावर समजलं, ही माळकांगोणी आहे ... आपल्या टेकडीवर माळकांगोणी!

 



माळाकांगोणीची साल, पानं, बिया, बियांचे तेल या सगळ्याचे आयुर्वेदात अनेक उपयोग सांगितलेले आहेत. याची पानं गुरं खातात. पानझडी प्रकारची ही वेल आहे. पानं खूप वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात – गोलाकार, लंबगोलाकार, दातेरी कडेची, टोकदार. नर आणि मादी फुलं वेगवेगळी असतात, फांद्यांच्या टोकांवर बारीक हिरव्या फुलांचे घोस येतात.

टेकडीच्या नव्याने प्रेमात पडायला हे अजून एक कारण सापडलंय. अशा मोठ्या वेली सहजासहजी कुठेही आढळत नाहीत. त्यांचा भार झेपेल अशी झाडंही तिथे असावी लागतात. पूर्ण विकसित अवस्थेतल्या अशा पश्चिम घाटातल्या जंगलांचं हे वैशिष्ट्य समजलं जातं. त्यामुळे सहसा आपल्याला माणसाचा हस्तक्षेप नसणार्‍या देवरायांमध्येच महालता बघायला मिळतात. अमर्याद चराई, जळणासाठी होणारी वृक्षतोड, दर वर्षी रान जाळणं, उत्साही पण अनभिज्ञ टेकडीप्रेमांनी केलेली वृक्षलागवड, वनखात्याने केलेली वृक्षलागवड अशा सगळ्या ढवळाढवळीनंतरही आपल्या टेकडीवर अशी काही बेटं अजून शिल्लक आहेत हा केवढा मोठा दिलासा आहे!

 

https://vishwakosh.marathi.gov.in/16394/

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Black%20Oil%20Plant.html

https://en.wikipedia.org/wiki/Celastrus_paniculatus

No comments:

Post a Comment