Thursday, 10 June 2021

कांगुणी / माळकांगोणी - Celastrus paniculatus, black oil tree

 गणपतीमध्ये मैत्रिणीकडे कोकणात जी पत्री असते, त्यातली एक फार सुंदर होती. तिचं नाव काही माहित नव्हतं. पोपटी रंगाचे मण्यांसारखे घोस, पिकले की आत सहा शेंदरी लाल रंगाच्या बिया दिसायच्या. कितीतरी वेळा गणपतीनंतर या बिया रुजवायचा प्रयत्न केला पण त्या कधी रुजल्या नाहीत. नंतर समजलं, ही एका वेलाची फळं आहेत. वेलाचं नाव कांगुणी / माळकांगोणी - Celastrus paniculatus (black oil tree). संस्कृतमध्ये ज्योतीष्मती. आपल्याकडच्या जंगलांमध्ये ज्या मोठ्या वेली सापडतात – महालता – liana – त्यातली ही एक आहे. 

पोपटी – पिवळी फळं हळुहळू उकलतात


आणि मग लाल शेंदरी बिया दिसायला लागतात


नेहेमीपेक्षा वेगळ्या वाटेने `जिज्ञासा'जवळून मागच्या आठवड्यात टेकडीवर गेलो, तर वाटेत उजव्या हाताला एक मस्त दाटी दिसली - दहिवण, बारतोंडी, धावडा ही दाटीवाटीने आलेली झाडं आणि त्यांच्यावर चढलेला वेल. वेलाची पानं काहीशी चंदनासारखी वाटावीत अशी पण रुंद, आणि हिरव्या मण्यांचे घोस... काहीतरी वेगळं आणि सुंदर सापडलं होतं आज. शोधाशोध केल्यावर समजलं, ही माळकांगोणी आहे ... आपल्या टेकडीवर माळकांगोणी!

 



माळाकांगोणीची साल, पानं, बिया, बियांचे तेल या सगळ्याचे आयुर्वेदात अनेक उपयोग सांगितलेले आहेत. याची पानं गुरं खातात. पानझडी प्रकारची ही वेल आहे. पानं खूप वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात – गोलाकार, लंबगोलाकार, दातेरी कडेची, टोकदार. नर आणि मादी फुलं वेगवेगळी असतात, फांद्यांच्या टोकांवर बारीक हिरव्या फुलांचे घोस येतात.

टेकडीच्या नव्याने प्रेमात पडायला हे अजून एक कारण सापडलंय. अशा मोठ्या वेली सहजासहजी कुठेही आढळत नाहीत. त्यांचा भार झेपेल अशी झाडंही तिथे असावी लागतात. पूर्ण विकसित अवस्थेतल्या अशा पश्चिम घाटातल्या जंगलांचं हे वैशिष्ट्य समजलं जातं. त्यामुळे सहसा आपल्याला माणसाचा हस्तक्षेप नसणार्‍या देवरायांमध्येच महालता बघायला मिळतात. अमर्याद चराई, जळणासाठी होणारी वृक्षतोड, दर वर्षी रान जाळणं, उत्साही पण अनभिज्ञ टेकडीप्रेमांनी केलेली वृक्षलागवड, वनखात्याने केलेली वृक्षलागवड अशा सगळ्या ढवळाढवळीनंतरही आपल्या टेकडीवर अशी काही बेटं अजून शिल्लक आहेत हा केवढा मोठा दिलासा आहे!

 

https://vishwakosh.marathi.gov.in/16394/

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Black%20Oil%20Plant.html

https://en.wikipedia.org/wiki/Celastrus_paniculatus

Thursday, 6 May 2021

वासनवेल

वासनवेल

Cocculus hirsutus

मुलीला व्यायाम्शाळेला पायी सोडताना जातायेता रस्त्याच्या कडेला असणारा flora बर्याच वेळा आकर्षीत करतो.  एका इलेक्ट्रीकल पोलच्या दुर्लक्षीत ठिकाणी बर्याच जंगली वेली नेहमी लक्ष वेधुन घेत असतात. आजच्या ह्या पानात अश्याच एका वेलीबद्द्ल लिहिणार आहे. 


हा वेल पोल साठी घातलेल्या फेन्स वर छान पसरला होता, आणी त्याला सुंदर बहर पण आला होता , अतीशय छोटी छोटी पिवळसर फुले त्याला लागली होती जी मला माझ्या कॅमेरात टिपणं कठीण जात होतं, बरेच दिवस मी ह्याचं नाव शोधत होते, एका दिवशी दिनेश वाळके ह्यंच्या flickr वर जेंव्हा ह्याचा फोटो बघीतला तेंव्हा ह्या वेलाची ओळख पटली , आनंदही झाला कि आपल्या भागामध्ये हा रानवेल आलाय, जो मला प्र्त्यक्ष पहायला मिळतोय.







Photos by Dinesh Valke

Cocculus hirsutus

ह्याची छोटी हिरवी फळं नंतर काळी होतात, ह्या फळांचा शाई सारखा वापर करता येतो असं वाचलं, म्हणुन मी ह्याची फळं येण्याची वाट बघत होते. पण काही दिवसांनी वेलाची छाटनी झालेली दिसली, व नंतर lockdown सुरु झाल्यांमुळे, ह्या वर्षी तरी  ह्याच्या काळ्या फळांची शाई करायचा माझा प्लान फिसकटला.


ह्या वेलाबद्दल जेंव्हा एका ग्रुपवर चर्चा चालली होती तेंव्हा एक गंमत अशी आढळली, ती म्हणजी माझ्यासारख्या काही जणांनी हा वेल इलेक्ट्रीकल पोलच्या आजुबाजुलाच आलेला पाहिला, हा योगायोग म्हणावा, कि दुर्दैवाने ह्या अश्या जागा कोणाच्या मालकीच्या नसल्याने, आपले native plant तीथे आसरा  घेत असावेत, नाहीतर सोसायटींच्या बागांमध्ये आले तर आपण लगेच त्यांना तण म्हणुन काढुन टाकत असु.


वासनवेलाचे आयुर्वेदामध्ये बरेच औषधी उपयोग सांगितले आहेत. 


https://www.flowersofindia.net/catalog/slides/Broom%20Creeper.html


Sunday, 25 April 2021

लघु अजान

 लघु अजान 


Ehretia aspera


म्हातोबा टेकडीवर मंदिराच्या पायथ्याशी आणि आमच्या सोसायटीच्या सिमेंटच्या भिंतीत हे झुडुप पहिल्यांदा पाहिलं.

झुडुपाकडे लक्ष जातं  जेंव्हा उन्हाळ्यात सुंदर अशी पांढरी फुलं गुच्छाने लागतात.

ह्याची पानं चामट व खरखरीत असतात, आणि जसजशी ती जुन होत जातात त्यांचा खरखरीत पणा वाढतच जातो.



मार्च / एप्रिल मध्ये उमलणारी फुले




मे- जुन मध्ये लागणारी फळे












जिज्ञासा टॆकडीवरील 5-6 foot उंच लघुअजान:








नंतर ते जिज्ञासा टॆकडीवर, उत्सव सभाग्रुहाच्या बाजुला असं बर्याच ठिकाणी दिसुन आलं, झाडं ओळखु आली कि ती ओळख आपणहुन देतात. तसच हे झुडूप नंतर बर्याच दुर्लक्षीत ठिकाणी आलेलं दिसलं.... नक्कीच कोणतातरी पक्षी ह्याच व्रुक्षारोपण करत असणार असं वाटतं.


हा लघुअजान म्हणजे अजान व्रुक्षाची छोटी आव्रुत्ती ....माझी मावशी वारकरी पंथातील होती, तीच्या मते ज्ञानेश्वरांनी त्यांच्या हातातली काठी आळंदीत जीथे रोवली तीथेच पुजनीय असा अजानव्रुक्ष जन्माला आला. जो आजही त्या ठिकाणी आहे.



महाजन सरांच्या  देशी  वॄक्ष ह्या पुस्तकात ह्या झाडाची छान माहीती आहे.


गंमत म्हणजे हा लघुअजान आमच्या सोसायटीच्या भिंतीत आला होता, जीथे त्याला छान फुलं/फळं येत होती. असंअसतानाही आम्हाला त्या झाडाची उगाच काळजी वाटु लागली, त्याला माती नसेल, कोणी पाणी घालत नाही ,....आणि मग ते झाड तिथुन उपटुन दुसर्या ठिकाणी हलवलं, आता हलवलेलं झुडुप सुकत चाललय. कदाचीत  पाऊस पडला तर परत वाढेल अशी आशा वाटते .. खुप वाईट वाटत होतं........ पण थोड्या दिवसांनी पाहिलं तर, जीथुन झाडं उपटलं होतं तीथे लघुअजान परत मुळातुन फुटला होता... ते बघुन  अपराधीपणा कमी झाला. 

सोसायटीच्या सिमेंटच्या भिंतीत आलेलं झाडं







आधी हिरवी / मग लाल चुटुक  होणारी फळं






उपटल्यावर मुळांच्या फुटव्यातुन पुनः आलेलं झुडुप