Thursday, 22 April 2021

बारतोंडी Morinda pubescenes

 म्हातोबाला जागोजागी भेटणारं एक बहुगुणी झाड म्हणजे बारतोंडी (Morinda pubescenes). मार्च – एप्रिलपासून फुलणार्‍या, काहीश्या निशिगंधासारख्या वाटणार्‍या या पांढर्‍या फुलांना सुंदर वास असतो. फुटबॉलसारखे वेगवेगळे तुकडे जोडून केल्यासारखी याची फळं अगदी सहज ओळखू येतात. फक्त शिकाऊ कामगाराने केल्याने हे एक – दोन इंच व्यासाचे पिटुकले फुटबॉल ओबडधोबड दिसतात. खरं तर हे एक फळ नाही, दहा-बारा फळं एकमेकांना खेटून साबणाच्या फुग्यांसारखी चिकटलेली असतात.  

 

बारतोंडीचं फूल

 

फळ तयार होतं आहे


 

फळं

बारतोंडी पहिल्यांदा भेटली ती ओरिसाच्या आदिवासी पाड्यावर. तिथल्या सुंदर हातमागाच्या कापडाला जे नैसर्गिक रंग वापरतात, त्यातले बरेचसे रंग ‘आल’ नावाच्या झाडाच्या मुळांपासून, सालीपासून तयार करतात असं समजलं. काळा, लाल, तपकिरी अशा सगळ्या छटा याच झाडापासून मिळतात. या ’आल’चा अजून शोध घेतल्यावर समजलं, की हाता-पायाला लावण्याचा लाल रंगाचा आलता / आळता या ‘आल’ पासूनच बनतो. इतकी सुंदर फुलं, आणि इतका सुंदर रंग! मी या झाडाच्या प्रेमातच पडले. मग नंतर समजलं, ‘आल’ म्हणजे आपल्या गावची बहुगुणी बारतोंडीच! औषधी गुणाधर्मांसाठी नावाजल्या गेलेल्या नोनीची (Morinda citrifolia) ही बहीण.

 

बारतोंडीचेही औषधी उपयोग आहेतच. वेदनाशामक म्हणून, विंचूदंशावर बारतोंडी गुणाकारी आहे. याची कच्ची फळं भाजी करून खातात. लाकूड चांगलं असलं तरी झाड फार मोठं होत नाही, त्यामुळे बैलांच्या मानेवरचं जू, बंदुकीचे दस्ते, हत्यारांच्या मुटी, कंगवे- फण्या अश्या लहान सहान वस्तू बनवण्य़ासाठी याचा वापर होतो.

 

बारतोंडी आणि चंदन यांचं साहचर्य असतं. या झाडाच्या पानांवर, डाहाळ्यांवर लव असते. खोडावरची साल भेगाळलेली ’क्रॉकोडाईल बार्क’ म्हणावे अशी असते.  

Saturday, 27 March 2021

कुसुंब / कुसुम्ब / कुसुम

 टेकडीवर बांबूच्या बेटाजवळचं एक झाड कित्येक दिवस आम्हाला चकवत होतं. आधी तर एकदा त्याच्या खाली मोहाची फुलं पडलेली दिसली त्यामुळे मी फार बारकाईने न बघता हे मोहाचंच झाड असणार असं ठरवून टाकलं. मग लक्षात आलं, ती फुलं या झाडावर कधीच दिसत नाहीत. काय असेल हे? चंदनचारोळी? का अजून काही? पण चारोळीला इतका बहर येतो, तेव्हाही या झाडाला अजिबात मोहोर नव्हता. मग?


गेले दोन एक आठवडे या झाडाचा उत्सव चालू आहे. याच्या पालवीचा रंग इतका मोहक आहे, की बाकी फुलं त्यापुढे फिकी पडावीत. हे कुसुम्बाचं झाड आहे! 




मोठ्या झाडाशेजारी एक छोटं झाड आहे, तोही कुसुम्बच. 



कुसुम्ब म्हणजे Schleichera oleosa हा भारतात सर्वत्र आढळणारा पानझडी वृक्ष आहे. यावर लाखेचे किडे असतात. कुसुंबावरची लाख चांगल्या प्रतीची समजली जाते. याच्या बीपासून काढलेलं तेल केसांसाठी, कपड्यांच्या बाटीक प्रिंटिंगसाठी इ. वापरलं जातं. हे लाकूड अतिशय कठीण, जड, बळकट असतं, ते जळण म्हणून आणि कोळसा बनवण्यासाठीही उत्तम आहे.  कुसुम्बाची साल, खोड, फळाचा गर, बियांचं तेल या सगळ्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. याची कोवळी पालवी, फळं, बियांचं तेल काही ठिकाणी खाण्यात वापरतात. 

  

कुसुम्बाची नर आणि मादी झाडं वेगवेगळी असतात असं वाचलं पण नर फुलं कशी दिसतात माहित नाही.

 

 

अधिक माहितीसाठी:

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Kusum%20Tree.html

http://tropical.theferns.info/viewtropical.php?id=Schleichera+oleosa

 

Sunday, 14 March 2021

दहीपळस, दहीवण



१४/०३/२०२१


दहीपळस, दहीवण, भोकर्‍या दहीन, भोटी

botanical name Cordia macleodii

दहीवणची आज दोन झाडं पाहिली म्हतोबा टेकडीवर , ह्यातल्या एका झाडाला फुलं/ फळं असं दोन्ही होतं , दुसर्‍या झाडावर मात्र फक्त फळेच होती. आणी ही दोन्ही झाडं एकमेकांपासुन बर्‍याच अंतरावर होती, पण दोन्हीही झाडं धामण झाडाला अगदी चिकटुन आली होती. हा योगायोग म्हणावा का??? 

 जुनी सर्व पाने खाली गळुन पडलेली दिसली,



नविन पालवी फुटली होती, त्यातलं एकच पान मोठं झालं होतं 




भोकराच्याच कुळातील हे झाड आहे. पण दहीवणाची फुलं अशी गुच्छाने लागतात




संपुर्ण झाड असं फुलांनी आणि फळांनी बहरलं होतं







महाजन सरांनी त्यांच्या देशी व्रुक्ष ह्या पुस्तकात छान माहिती दिली आहे. ह्याच्या बियांपासुन नवीन रोपं करायचा विचार येतोय......

दहीपळस झाड पावसाळ्यात पहिलं, तेंव्हा त्याच रुप भारी वाटलं, ह्याला दहीपळस नाव का पडलं असेल ह्याच कोडं सुटलं, मार्च महिन्यात निष्पर्ण असलेलं झाड पाहिलं होतं, आणि आता टेकडीवर जेंव्हा ह्याला पाहिलं तेंव्हा ह्याची पालवी बघुन थोडावेळ पळसाचीच आठवण झाली, , आणि पान वरुन येवढं गर्द हिरवं दिसत होतं, पण वारं आलं कि एखाद्या जादु सारखं पांढरं फटफटीत दिसायचं,. पानाची खालील बाजु अगदिच भुरकट रंगाची आहे. धुपछावच्या साडीसारखं क्षणात गर्द हिरवं आणि क्षणात चंदेरी......




पळसाची आठवण करुन देणारी पालवी



ref:

http://flora-peninsula-indica.ces.iisc.ac.in/herbsheet.php?id=2080&cat=7

https://indiabiodiversity.org/species/show/265741