Saturday 27 March 2021

कुसुंब / कुसुम्ब / कुसुम

 टेकडीवर बांबूच्या बेटाजवळचं एक झाड कित्येक दिवस आम्हाला चकवत होतं. आधी तर एकदा त्याच्या खाली मोहाची फुलं पडलेली दिसली त्यामुळे मी फार बारकाईने न बघता हे मोहाचंच झाड असणार असं ठरवून टाकलं. मग लक्षात आलं, ती फुलं या झाडावर कधीच दिसत नाहीत. काय असेल हे? चंदनचारोळी? का अजून काही? पण चारोळीला इतका बहर येतो, तेव्हाही या झाडाला अजिबात मोहोर नव्हता. मग?


गेले दोन एक आठवडे या झाडाचा उत्सव चालू आहे. याच्या पालवीचा रंग इतका मोहक आहे, की बाकी फुलं त्यापुढे फिकी पडावीत. हे कुसुम्बाचं झाड आहे! 




मोठ्या झाडाशेजारी एक छोटं झाड आहे, तोही कुसुम्बच. 



कुसुम्ब म्हणजे Schleichera oleosa हा भारतात सर्वत्र आढळणारा पानझडी वृक्ष आहे. यावर लाखेचे किडे असतात. कुसुंबावरची लाख चांगल्या प्रतीची समजली जाते. याच्या बीपासून काढलेलं तेल केसांसाठी, कपड्यांच्या बाटीक प्रिंटिंगसाठी इ. वापरलं जातं. हे लाकूड अतिशय कठीण, जड, बळकट असतं, ते जळण म्हणून आणि कोळसा बनवण्यासाठीही उत्तम आहे.  कुसुम्बाची साल, खोड, फळाचा गर, बियांचं तेल या सगळ्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. याची कोवळी पालवी, फळं, बियांचं तेल काही ठिकाणी खाण्यात वापरतात. 

  

कुसुम्बाची नर आणि मादी झाडं वेगवेगळी असतात असं वाचलं पण नर फुलं कशी दिसतात माहित नाही.

 

 

अधिक माहितीसाठी:

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Kusum%20Tree.html

http://tropical.theferns.info/viewtropical.php?id=Schleichera+oleosa

 

No comments:

Post a Comment