Thursday 22 April 2021

बारतोंडी Morinda pubescenes

 म्हातोबाला जागोजागी भेटणारं एक बहुगुणी झाड म्हणजे बारतोंडी (Morinda pubescenes). मार्च – एप्रिलपासून फुलणार्‍या, काहीश्या निशिगंधासारख्या वाटणार्‍या या पांढर्‍या फुलांना सुंदर वास असतो. फुटबॉलसारखे वेगवेगळे तुकडे जोडून केल्यासारखी याची फळं अगदी सहज ओळखू येतात. फक्त शिकाऊ कामगाराने केल्याने हे एक – दोन इंच व्यासाचे पिटुकले फुटबॉल ओबडधोबड दिसतात. खरं तर हे एक फळ नाही, दहा-बारा फळं एकमेकांना खेटून साबणाच्या फुग्यांसारखी चिकटलेली असतात.  

 

बारतोंडीचं फूल

 

फळ तयार होतं आहे


 

फळं

बारतोंडी पहिल्यांदा भेटली ती ओरिसाच्या आदिवासी पाड्यावर. तिथल्या सुंदर हातमागाच्या कापडाला जे नैसर्गिक रंग वापरतात, त्यातले बरेचसे रंग ‘आल’ नावाच्या झाडाच्या मुळांपासून, सालीपासून तयार करतात असं समजलं. काळा, लाल, तपकिरी अशा सगळ्या छटा याच झाडापासून मिळतात. या ’आल’चा अजून शोध घेतल्यावर समजलं, की हाता-पायाला लावण्याचा लाल रंगाचा आलता / आळता या ‘आल’ पासूनच बनतो. इतकी सुंदर फुलं, आणि इतका सुंदर रंग! मी या झाडाच्या प्रेमातच पडले. मग नंतर समजलं, ‘आल’ म्हणजे आपल्या गावची बहुगुणी बारतोंडीच! औषधी गुणाधर्मांसाठी नावाजल्या गेलेल्या नोनीची (Morinda citrifolia) ही बहीण.

 

बारतोंडीचेही औषधी उपयोग आहेतच. वेदनाशामक म्हणून, विंचूदंशावर बारतोंडी गुणाकारी आहे. याची कच्ची फळं भाजी करून खातात. लाकूड चांगलं असलं तरी झाड फार मोठं होत नाही, त्यामुळे बैलांच्या मानेवरचं जू, बंदुकीचे दस्ते, हत्यारांच्या मुटी, कंगवे- फण्या अश्या लहान सहान वस्तू बनवण्य़ासाठी याचा वापर होतो.

 

बारतोंडी आणि चंदन यांचं साहचर्य असतं. या झाडाच्या पानांवर, डाहाळ्यांवर लव असते. खोडावरची साल भेगाळलेली ’क्रॉकोडाईल बार्क’ म्हणावे अशी असते.  

No comments:

Post a Comment