Friday 23 April 2021

मोई Lannea coromandelica

 टेकडीवर जागोजाग दिसणार्‍या या ‘मोई’ची (Lannea coromandelica) ची ओळख करून दिली ती अभिजितने. तोवर मोईचं नावही माहित नव्हतं. ‘मोई आणि सालई या बहिणी बहिणी आहेत, सहसा त्या जोडीने दिसतात’ त्याने सांगितलं होतं. पण म्हातोबाच्या टेकडीवर तरी सालईशी कट्टी करून मोई एकटीच दिसते. सालईनेसुद्धा मग शेजारी एआरएआयच्या टेकडीवर मोईशिवाय रहायचं ठरवलं असावं.

 

पालवी



उन्हाळ्याच्या सुरुवातीचं, एकही पान नाही, एकही फूल नाही, फक्त आकाशाच्या पार्श्वभूमीवर खुलून दिसणारे फांद्यांच्या टोकाला आलेले हिरव्या – जांभळ्या फळांचे घोस असं मोईचं रूप मोहवणारं. ते चित्रात बंदिस्त करायचा मोह झालाच. :) 

 

फळांचे तुरे


माझी मोई😊

 

आंब्याच्या कुळातल्या मोईलाही आंब्यासारखा मोहोर येतो. साल गुळगुळीत, बरीचशी गोरीगोरी. पालवी छान लाल रंगाची. पानं – फुलं – फळं दाटीवाटी करून फांद्यांच्या टोकाला येतात, त्यामुळे मला हे झाड चिनी चित्रातलं झाड वाटतं. सालई – मोई बहिणी असतील तर त्यातली सालई गबाळी राहणारी, सालांचा पसारा करणारी बहीण, मोई नीटनेटकी.

 

मोईचा मोहोर

 

फळं धरायला सुरुवात झाली आहे


महाजन सरांनी सांगितलंय, की मोईचं लाकूड बर्‍यापैकी टिकाऊ आणि जलरोधक असतं. त्याचा उपयोग घरबांधणीमध्ये, मुख्यतः फळ्या बनवण्यासाठी, खोकी तयार करण्यासाठी, शेतीच्या अवजारांमध्ये, होड्या बनवण्यासाठी होतो. पानं आणि कोवळे शेंडे गुरं चारा म्हणून खातात. मोईचा डिंक कापड उद्योगात वापरतात. या झाडाची पानं, साल, डिंक यांचे औषधी उपयोग आहेत.

 

टेकडीवर म्हातोबाला जातांना एकीकडे ओळीने मोईची झाडं आहेत. नेहमी जाता येता त्यांचा मोहोर बघत ‘आता थोड्या दिवसांनी यांना मस्त फळं धरतील’ असे मी मनात मांडे खात होते. पण आपल्या टेकडीचा शाप आडवा आला – दर वर्षीप्रमाणे कुणीतरी हा भाग पेटवून दिला. सगळं गवत, झाडोरा जळून गेलाच, पण मोईच्या फांद्यांपर्यंतही धग पोहोचली, सगळा मोहोर करपून गेला.😢

 

 

याच रांगेतल्या एका मोईने चांगलंच चकवलं. झाड वाटतंय तर मोईसारखंच, पण या एकाच झाडाला वेगळी दिसणारी फळं कशी म्हणून आम्हाला प्रश्न पडला. नंतर समजलं, ही फळं नाहीत, ही कुठल्यातरी किड्याची करामत – insect galls आहेत!

 

Insect galls on Moi

मोई आपल्या देशात सर्वत्र आढळणारी, भरभर वाढणारी, देखणी, बहुविध उपयोगी. वनीकरणासाठी एकदम आदर्श. त्यातही एआरएआयच्या टेकडीवर मारुती मंदिरासमोरच्या मोईला मस्त पार आहे. कुणी उत्साही लोकांनी या झाडाच्या फांदीला मस्त जाडजूड दोर बांधून वर चढायची किंवा मोगलीसारके झोके घ्यायची सोय केली होती. माऊ आणि तिच्या सखीने कितीतरी वेळा या दोरावर मनसोक्त खेळून घेतलं आहे. इतका सुंदर झोका आम्हाला पुन्हा कुठे नाही मिळाला!     

No comments:

Post a Comment