Saturday 24 April 2021

बीजा Pterocarpus marsupium आणि वावळ Holoptelea integrifolia

दोन – अडीच सेंमी व्यासाची सोनेरी तपकिरी चकती. वार्‍यावर सहज उडू शकणारी. इतकी सहज, की समोरच्या डोंगरावरून उडत सातव्या मजल्यावरच्या माझ्या बाल्कनीमध्ये पोहोचू शकते ही. ही वावळाची शेंग(का फळ?). त्यातच एकच गोलाकार, चपटी बी. सध्या टेकडीच्या बर्‍याच भागात या बियांचा खच पडलेला दिसतो. ही फळं माकडं आवडीने खातात, म्हणून याचं इंग्रजी नाव monkey biscuit. जमिनीवरच्या शेंगांना फारच धूळ वाटली, म्हणून फक्त आतली बी खायचा प्रयत्न केला, तर चालता चालता सोलण्याच्या नादात एक तर ती नाजूक छोटीशी बी खाली पडून जायची, नाही तर तुटून जायची. एक बी कशीबशी तोंडात गेली, पण तेवढ्याने माकडाच्या बिस्किटांची चव काही समजली नाही.  

 

वावळाच्या शेंगेची मोठी बहीण शोभेल अशी दुसरी एक शेंग पण टेकडीवर सध्या भरपूर मिळतेय. वावळ दोन – तीन सेमी व्यासाची असेल तर बीजाची चकती पाच सेमी पर्यंत मोठी. रंग तसाच, आकारही तसाच. आधी  आम्ही बीजालाच वावळ समजलो होतो. पण चकती सारखी दिसली आणि दोन्ही फळं एकाच काळात मिळत असली, तरी वावळ आणि बीजा वेगवेगळ्या कुळातली झाडं आहेत. बीजाची पानं संयुक्त, करंजासारख्या आकाराची, तर वावळाची साधी. बीजाची फुलं एक सेमी आकाराची पिवळी, तर वावळाला हिरवट पिवळ्या ते तपकिरी रंगाचे बारीक तुरे येतात. बीजाची चकती बर्‍यापैकी कठीण, वावळाची हाताने सहज कुस्करली जाणारी.

 

मोठा बीजा, लहान वावळ


बीजा हा भरपूर उंचनीच होणारा, मोठ्या विस्ताराचा पानझडी वृक्ष. हा विशेषतः सह्याद्री आणि सातपुड्याच्या डोंगराळ भागात आढळतो. बीजाची झाडं उन्हाळ्यात फुलतात, आणि पुढच्या हिवाळ्या – उन्हाळ्यामध्ये असंख्य फळं तयार होऊन झाडाखाली खच साचतात, वार्‍याबरोबर ती दूर दूरपर्यंत पोहोचतात. बीजाचं लाकूड कठीण, जड, टिकाऊ असतं. साग आणि सालप्रमाणेच बीजाचं लाकूडही रेल्वे स्लीपर्ससाठी वापरतात. फर्निचर, बैलगाड्या, बोटी, शेतीची अवजारे, खेळणी त्यापासून बनवतात. बीजाचा डिंक  (Malabar Kino) वाळलेल्या रक्तासारखा दिसतो. त्याचे अनेक औषधी उपयोग आहेत. पानेही औषधासाठी वापरतात. बीजाची पाने व बिया खाण्याजोग्या असतात.

 


सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारी बीजाच्या झाडावरची सोनेरी फळं

बीजाचा मोहोर आणि हिरवी फळं


आपल्या देशाचा हिमालयाचा, अतिपावसाचा आणि वाळवंटी भाग सोडला तर वावळ सगळीकडे आढळतो. वावळाचं झाड २५ मीटरपर्यंतही वाढू शकतं. हिवाळ्यात पानझड होते. फेब्रुवारी मार्चपासून फुलांचे छोटे छोटे तुरे दिसायला लागतात, आणि मार्च – एप्रिलमध्ये फळं येतात. त्याच वेळी पालवीही येते. फळं सुरुवातीला हिरवीगार असतात, ती वाळून नंतर बदामी – तपकिरी होतात.

 

वावळाची साल, पानं आणि बिया यांचे औषधी उपयोग आहेत. याचं भक्कम लाकूड इमारतींच्या बांधकामासाठी, शेतीची अवजारं, बैलगाड्या आणि काडेपेट्या – कंगवे अशा वस्तू बनवण्यासाठी वापरतातच, पण ते कोरीव काम करण्यासाठी, कोळसा बनवण्यासाठीही चांगलं समजतात. याची पानं गुरं खातात. या बियांपासून मेळाघाट, चिखलदरा भागात खाद्यतेलही काढतात. 

 

वावळाचं फळ


No comments:

Post a Comment