Friday 17 September 2021

नंदीबैलाच वारूळ

 उन्हाळ्यात लहानपणी खेळताना डोंगरपायथ्याशी भुसभुशीत वाटेवर  ह्या किड्याची खूप वारूळ गावाला पाहिली होती, 


 



गावातल्या लहान मित्रमैत्रिणींनी ह्याची नंदीबैलाच वारुळ अशी ओळख करून दिली होती. गावातली लहान मुलं ह्यांच्या वारुळाला अगदी बारीक काडीने स्पर्श करायची, आणि नंदीबैला, नंदीबैला बाहेर ये!  असं गाणं गायची आणि आतला कीडा खरच बाहेर यायचा, थोडं मोठं झाल्यावर कळलं की हा नंदीबैल नावाचा किड्याचं नरसाळ्यासारखं भुसभुशीत वारूळ म्हणजे मुंग्या पकडायचा सापळा आहे मग आम्ही एखादी मुंगी टाकूनही बघायचो.


पुण्यात आल्यावर आपल्या म्हातोबा टेकडीच्या मंदिरात पहिल्यांदा गेलो, म्हणजे ही तेंव्हाची गोष्ट आहे जेंव्हा देव अजून श्रीमंत झाला नव्हता. मंदिर अगदी छोट आणि साधं होतं, गाभाराच तेवढा बांधला गेला होता आणि गाभाऱ्याबाहेरच्या मऊ भुसभुशीत मातीत म्हातोबा ने अनेक नंदीबैलांना आश्रय दिला होता. नंदीबैलांबद्दल माझ्या लहान मुलीला सांगितल्यावर ह्या मंदिराला नंदीबैलाच मंदिर असच नाव पाडलं होत. काही वर्षांनीं देव श्रीमंत झाला आणि त्याने माणसांच्या पूजाअर्चासाठी सगळी नंदीबैलांच्या वारुळांची जागा बळकावली. असो पण बरेच दिवस मी ह्या किड्याच scientific नाव शोधत होते जे मला आज अपघाताने कळलं
















        


 Google lens प्रमाणे हा antlion चा प्रकार वाटत आहे, तज्ञांनी ह्यावर प्रकाश टाकावा.
 
आपण एवढे वर्षे ज्याला नंदीबैल म्हणून संबोधत आहोत तो  ह्या antlion चा सुरवंट (grub) आहे. ज्याला इंग्रजीत doodle bug अस म्हणतात हे कळलं

 हा खालचाantlion चा विडिओ नक्की बघा

https://youtu.be/CWkfAyfBDHE

माणसाच्या हस्तक्षेपामुळे ह्यांची घरटी खूप कमी झाली आहेत, लहानपणी जेवढी वारूळ दिसायची तेवढी आज दिसत नाहीत, म्हणून ह्यांना जपुया, टेकडीवरच्या पायवाटेवर अजूनही असतात ती, पण अपघाताने तुडवली जातात, टेकडीवर  लक्षपूर्वक पायांनीच चालूया.

 

Friday 6 August 2021

Andrographis echioides / False water-willow

रानचिमणी  

B.N.  Andrographis echioides

Common Name: False water-willow

जिज्ञासाच्या रस्त्याने टेकडीवर जाताना एक अतिशय सुंदर आणि दुर्मिळ वनस्पती (हर्ब) दिसली. प्रतेक पानाच्या वरच्या बाजुने खोडातुन दिपस्तंभाप्रमाने तुरे आले होले. त्या प्रतेक तुर्‍यामध्ये अनेक कळ्या होत्या, प्रतेक तुर्‍यामध्ये एकेक दिवा तेवावा तसे एकेक फुल ह्या झाडावर तेवत होते, जे एखाद्या ऑर्किड प्रमाने वाटले. ऑफ व्हाईट कलरच्या ह्या छोट्याश्या फुलावर गर्द तांबड्या रंगाची नक्षी/ठिपके होते. खोडावर पानावर, कळ्यांवरही नाजुक लव पाहिली. ओरिसा मध्ये ह्याला लवलता का म्हणतात ते कळले, पण मराठीत रान चिमणी का म्हणतात हे कोडं काही सुटलं नाही. ह्या वनस्पतीचे कैक उपयोग आयुर्वेदात आढळले. 












https://www.flowersofindia.net/catalog/slides/False%20Waterwillow.html


Friday 9 July 2021

Jatropha curcas

मराठी नाव: मोगली एरण्डी

B.N: Jatropha curcas


एरंडी चे आपल्या टेकडीवरील दोन प्रकार आधीच बघण्यात आले होते. Jatropha gossypiifolia L. आणि Jatropha nana , अगदी पावसाच्या सुरवातीलाच हे दोन्ही प्रकार फुलायला लागतात, पण ऎन पावसाळ्यात जुलै नंतर दिसणारे हे Jatropha family तील झुडुपाशी तोंड ओळख होती, पण कुळ आज कळले.

मोगली ऎरण्डी नावाचे हे झुडुप अतीविषारी असुन त्याला हिंदी मध्ये जमाल गोटा म्हणतात. हे नाव ऎकू्न बर्‍याच हिंदी सिनेमांची आठवण होते ना :-)


अतीविषारी असलेल्या झुडुपाची पाने टेकडीवर कायम कुरतडलेली असतात, एकच विशिष्ट किटक ह्या झाडाचा इतका मनापासुन आस्वाद घेत असतो कि कायम ह्याच्या मोठ्या मोठ्या पानांची चाळणी झालेली दिसते. 


 
 



 











ह्या प्रकारच्या एरंडीचा बियांचा औषध सोडले तर बायोफ़्युअल म्हणुन उपयोग केला जातो. डिझेल इंजिन मध्ये ह्या तेलावर काहीही प्रक्रिया न होता वापरु शकतो.

Thursday 10 June 2021

कांगुणी / माळकांगोणी - Celastrus paniculatus, black oil tree

 गणपतीमध्ये मैत्रिणीकडे कोकणात जी पत्री असते, त्यातली एक फार सुंदर होती. तिचं नाव काही माहित नव्हतं. पोपटी रंगाचे मण्यांसारखे घोस, पिकले की आत सहा शेंदरी लाल रंगाच्या बिया दिसायच्या. कितीतरी वेळा गणपतीनंतर या बिया रुजवायचा प्रयत्न केला पण त्या कधी रुजल्या नाहीत. नंतर समजलं, ही एका वेलाची फळं आहेत. वेलाचं नाव कांगुणी / माळकांगोणी - Celastrus paniculatus (black oil tree). संस्कृतमध्ये ज्योतीष्मती. आपल्याकडच्या जंगलांमध्ये ज्या मोठ्या वेली सापडतात – महालता – liana – त्यातली ही एक आहे. 

पोपटी – पिवळी फळं हळुहळू उकलतात


आणि मग लाल शेंदरी बिया दिसायला लागतात


नेहेमीपेक्षा वेगळ्या वाटेने `जिज्ञासा'जवळून मागच्या आठवड्यात टेकडीवर गेलो, तर वाटेत उजव्या हाताला एक मस्त दाटी दिसली - दहिवण, बारतोंडी, धावडा ही दाटीवाटीने आलेली झाडं आणि त्यांच्यावर चढलेला वेल. वेलाची पानं काहीशी चंदनासारखी वाटावीत अशी पण रुंद, आणि हिरव्या मण्यांचे घोस... काहीतरी वेगळं आणि सुंदर सापडलं होतं आज. शोधाशोध केल्यावर समजलं, ही माळकांगोणी आहे ... आपल्या टेकडीवर माळकांगोणी!

 



माळाकांगोणीची साल, पानं, बिया, बियांचे तेल या सगळ्याचे आयुर्वेदात अनेक उपयोग सांगितलेले आहेत. याची पानं गुरं खातात. पानझडी प्रकारची ही वेल आहे. पानं खूप वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात – गोलाकार, लंबगोलाकार, दातेरी कडेची, टोकदार. नर आणि मादी फुलं वेगवेगळी असतात, फांद्यांच्या टोकांवर बारीक हिरव्या फुलांचे घोस येतात.

टेकडीच्या नव्याने प्रेमात पडायला हे अजून एक कारण सापडलंय. अशा मोठ्या वेली सहजासहजी कुठेही आढळत नाहीत. त्यांचा भार झेपेल अशी झाडंही तिथे असावी लागतात. पूर्ण विकसित अवस्थेतल्या अशा पश्चिम घाटातल्या जंगलांचं हे वैशिष्ट्य समजलं जातं. त्यामुळे सहसा आपल्याला माणसाचा हस्तक्षेप नसणार्‍या देवरायांमध्येच महालता बघायला मिळतात. अमर्याद चराई, जळणासाठी होणारी वृक्षतोड, दर वर्षी रान जाळणं, उत्साही पण अनभिज्ञ टेकडीप्रेमांनी केलेली वृक्षलागवड, वनखात्याने केलेली वृक्षलागवड अशा सगळ्या ढवळाढवळीनंतरही आपल्या टेकडीवर अशी काही बेटं अजून शिल्लक आहेत हा केवढा मोठा दिलासा आहे!

 

https://vishwakosh.marathi.gov.in/16394/

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Black%20Oil%20Plant.html

https://en.wikipedia.org/wiki/Celastrus_paniculatus

Thursday 6 May 2021

वासनवेल

वासनवेल

Cocculus hirsutus

मुलीला व्यायाम्शाळेला पायी सोडताना जातायेता रस्त्याच्या कडेला असणारा flora बर्याच वेळा आकर्षीत करतो.  एका इलेक्ट्रीकल पोलच्या दुर्लक्षीत ठिकाणी बर्याच जंगली वेली नेहमी लक्ष वेधुन घेत असतात. आजच्या ह्या पानात अश्याच एका वेलीबद्द्ल लिहिणार आहे. 


हा वेल पोल साठी घातलेल्या फेन्स वर छान पसरला होता, आणी त्याला सुंदर बहर पण आला होता , अतीशय छोटी छोटी पिवळसर फुले त्याला लागली होती जी मला माझ्या कॅमेरात टिपणं कठीण जात होतं, बरेच दिवस मी ह्याचं नाव शोधत होते, एका दिवशी दिनेश वाळके ह्यंच्या flickr वर जेंव्हा ह्याचा फोटो बघीतला तेंव्हा ह्या वेलाची ओळख पटली , आनंदही झाला कि आपल्या भागामध्ये हा रानवेल आलाय, जो मला प्र्त्यक्ष पहायला मिळतोय.







Photos by Dinesh Valke

Cocculus hirsutus

ह्याची छोटी हिरवी फळं नंतर काळी होतात, ह्या फळांचा शाई सारखा वापर करता येतो असं वाचलं, म्हणुन मी ह्याची फळं येण्याची वाट बघत होते. पण काही दिवसांनी वेलाची छाटनी झालेली दिसली, व नंतर lockdown सुरु झाल्यांमुळे, ह्या वर्षी तरी  ह्याच्या काळ्या फळांची शाई करायचा माझा प्लान फिसकटला.


ह्या वेलाबद्दल जेंव्हा एका ग्रुपवर चर्चा चालली होती तेंव्हा एक गंमत अशी आढळली, ती म्हणजी माझ्यासारख्या काही जणांनी हा वेल इलेक्ट्रीकल पोलच्या आजुबाजुलाच आलेला पाहिला, हा योगायोग म्हणावा, कि दुर्दैवाने ह्या अश्या जागा कोणाच्या मालकीच्या नसल्याने, आपले native plant तीथे आसरा  घेत असावेत, नाहीतर सोसायटींच्या बागांमध्ये आले तर आपण लगेच त्यांना तण म्हणुन काढुन टाकत असु.


वासनवेलाचे आयुर्वेदामध्ये बरेच औषधी उपयोग सांगितले आहेत. 


https://www.flowersofindia.net/catalog/slides/Broom%20Creeper.html