Sunday, 14 March 2021

दहीपळस, दहीवण



१४/०३/२०२१


दहीपळस, दहीवण, भोकर्‍या दहीन, भोटी

botanical name Cordia macleodii

दहीवणची आज दोन झाडं पाहिली म्हतोबा टेकडीवर , ह्यातल्या एका झाडाला फुलं/ फळं असं दोन्ही होतं , दुसर्‍या झाडावर मात्र फक्त फळेच होती. आणी ही दोन्ही झाडं एकमेकांपासुन बर्‍याच अंतरावर होती, पण दोन्हीही झाडं धामण झाडाला अगदी चिकटुन आली होती. हा योगायोग म्हणावा का??? 

 जुनी सर्व पाने खाली गळुन पडलेली दिसली,



नविन पालवी फुटली होती, त्यातलं एकच पान मोठं झालं होतं 




भोकराच्याच कुळातील हे झाड आहे. पण दहीवणाची फुलं अशी गुच्छाने लागतात




संपुर्ण झाड असं फुलांनी आणि फळांनी बहरलं होतं







महाजन सरांनी त्यांच्या देशी व्रुक्ष ह्या पुस्तकात छान माहिती दिली आहे. ह्याच्या बियांपासुन नवीन रोपं करायचा विचार येतोय......

दहीपळस झाड पावसाळ्यात पहिलं, तेंव्हा त्याच रुप भारी वाटलं, ह्याला दहीपळस नाव का पडलं असेल ह्याच कोडं सुटलं, मार्च महिन्यात निष्पर्ण असलेलं झाड पाहिलं होतं, आणि आता टेकडीवर जेंव्हा ह्याला पाहिलं तेंव्हा ह्याची पालवी बघुन थोडावेळ पळसाचीच आठवण झाली, , आणि पान वरुन येवढं गर्द हिरवं दिसत होतं, पण वारं आलं कि एखाद्या जादु सारखं पांढरं फटफटीत दिसायचं,. पानाची खालील बाजु अगदिच भुरकट रंगाची आहे. धुपछावच्या साडीसारखं क्षणात गर्द हिरवं आणि क्षणात चंदेरी......




पळसाची आठवण करुन देणारी पालवी



ref:

http://flora-peninsula-indica.ces.iisc.ac.in/herbsheet.php?id=2080&cat=7

https://indiabiodiversity.org/species/show/265741




Monday, 15 February 2021

Celastraceae (Spike-thorn family)- हेंकल, लोखंडी, कांगुणी

 

आज टेकडीवरचं हे Celastraceae (Spike-thorn family) वर्गातील झुडुपं बघुन बराच गुंता सुटला.. पुर्वी बघीतलेली बरीच झुडुपं /महालता  ज्यांची ओळख पटली नव्हती त्यांची ओळख झाली. अर्थात ह्या पानातील तीनही वनस्पती वेगवेगळ्या आहेत. त्यांच्याबद्दल क्रमशः लिहीत आहे


1 हेंकल

हे झाड पहिल्यांदा पाहिलं तेंव्हा अगदी नविन होतं माझ्यासाठी , पहिल्यांदाच ऒळख पटलेलं, पण त्यानंतर अगदी वारंवार दिसलं हे टेकडीवर....... आता ह्याला फुललेलं पहायचयं येणार्‍या मोसमात, त्याचीच आतुरतेने वाट पहातेयं........दोन मोठ्ठी झाडं आहेतं ओळखीची, लक्ष ठेवायला हवयं....







Sited On: 14/02/2021

at: Mhotoba Tekadi

Common name: Red Spike Thorn,

Botanical name - Gymnosporia senegalensis 

मराठी: हेंकल

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Red%20Spike%20Thorn.html

टेकडीवर आज पर्यंत मला जी छोटी काटा असलेली रोप दिसत होती  ( त्यांच्या पानांच्या तांबट देठावरुन मी त्यांना आजपर्यंत धावड्याची रोपं समजत होते :-)),  ती  हेंकल ची रोपं आहेत, कारण आता भले मोठे दिसू लागले आहेत




2  लोखंडी, मकरखाना, लेची.

४/५ वर्षांपुर्वी हरीशचन्द्र गडाजवळच्या कोकणकड्यावर ट्रान्स सह्याद्री बरोबरच्या ट्रेक सोबत गेलो असता हे झुडुप बघितलं होतं!


हे आठवणीत राहीलं ह्याच कारण असं कि  एकाच वेळी फ़ुलं , पानं , कच्ची फळं, पिकुन उकललेली फळं, आणि ह्या एका छोट्याश्या झाडावर (shrub) येवढे किटक होते कि किटकांच साम्राज्यच होतं असं म्हणावं लागेल, पण तेव्हा photography ची सवय नव्हती हे सगळे किटक टिपायला, 

आज टेकडीवरचं एक झाड शोधताना ह्याची ओळख पटली.



milkweed assassin nymph and its eggs


Sited on: 26 november 2017

at: Kokankada near Harishchandra gad

B.N:  Maytenus rothiana

Common name: Roth's Spike Thorn


http://www.flowersofindia.net/catalog/slides/Roth's%20Spike%20Thorn.html


3. कांगुणी /, माळकांगोणी  /ज्योतिष्मती

ह्याच कुटुंबातल्या आणखी एका झाडाची फळं मी कोकणात दर वर्षी पाहत आले आहे. आमच्या गावी (कोकणात) गणेश उत्सव मोट्या जोमाने साजरा करतात. गणपतीची आरास म्हणजे मुर्तीवर फुलोर्‍याने सजवलेली मंडपी!!, आणि ह्या मंडपीला कोकणातच उपलब्ध असलेल्या फळाफुलांनी सजवतात. ह्या सजावटीत एका फळांच्या घडाचा वापर केला जातो. रीत म्हणून वापरत असलेत्या फळाची आज ओळख पटली. 

 




Common Name: Black OIl Seed

Botanical Name: Celastrus paniculatus. 


http://www.flowersofindia.net/catalog/slides/Black%20Oil%20Plant.html

हा महालता large woody climber आहे, फळांचा वापर बाजारात खुप मोठ्या प्रमाणात गणपतीच्या पुजेसाठी करतात, अनेक  हिरव्या फळांचे घड गणेश चतुर्थी मध्ये दिसतात. जे काही दिवसातच पक्व होवुन तीन पाकळ्यांमध्ये उमलतात. आणि आतमधल सुंदर भगवं /लाल बी दिसु लागतं.  ह्या झाडाचा आयुर्वेदामध्ये बरेच वापर सांगितले आहेत , म्हणुन ह्या झाडाला जास्त महत्व मिळाले आहे. बुद्धी विकासासाठी brain tonic म्हणूनही ह्याचा वाप्रर करतात. म्हणून ज्योतिष्मती हे नाव पडलं असावं.

पुढच्या वेळी गणपतीत जर गावाला गेलो तर ह्या महालता ला नक्कीच भेटु.

28/05/2021

कोरोनामुळे पुण्याबाहेरची माझी भटकंती पूर्ण थांबली होती, त्यामुळे कंगोनीची महालता मला कधी दिसेल, हे एक स्वप्नच राहिले.

पण आज महातोबाने ते स्वप्न पूर्ण केले, आडमार्गाने म्हातोबाला जाताना दहिवणाच्या झाडांच्या थोडंस पुढे मोहाच्या  आणि बारतोंडी च्या झाडावर ही महालता दिसली, तिचे घोस बघताच मला कळले की ही कांगोनी तर नाही ना, Oikos च्या केतकी आणि मानसी कडून लगेच पडताळून पाहिले.

आणि खूप आनंद झाला की आपल्या महातोबाच्या टेकडीवर कांगोनी सारखी पश्चिम घाटात दिसणारी महालता आहे, हे बघून हा प्रश्न नक्कीच मनात येतो खरच पुण्यातल्या टेकड्या ह्या खुरट्या जंगलाच्या प्रकारात मोडतात का?

इंग्रजांनी केलेल्या नोंदीवरून हा निष्कर्ष निघतो की ह्या टेकड्या सवाना सारख्या  खुरटी झुडुपे व गवताळ माळराने सारख्या भागात मोडतात. पण इंग्रजांच्या आधी पुणेकरांनी व इथे राहाणार्यांनी ही वृक्ष तोड केल्यामुळे तर नसतील ना झाल्या ह्या सवाना असाही प्रश्न पडतो.....

असो enjoy माळ कांगोनी from deep forest of म्हातोबा.....








Friday, 29 January 2021

कवटी बोरं 😉

 म्हतोबा पासुन वेताळ टेकडीकडे जातानाच्या रस्त्यावर एक  बोरांसारख  झाडं आहे. अक्षरशः अनेक बोरं सुकुन खाली पडलेली असतात, येवढी टणक बोरं महबुत चोचींचे पक्षीचं खाऊ शकतील.ही बोरं खायची खुप इच्छा होते नेहमी,  ह्यांचा कडक पणा  बघुन खायची भीती वाटत असते. 

या रविवारी वेताळ टेकडीवर (उजव्या बाजुच्या भागात) गेलो होतो.  इथे खुरट्या झुडपांची (scrubland) अनेक झाडे आहेत, मधुन मधुन  सोनसावर आणि बिब्याची झाडे आहेत. सोनसावर फुलली कि तीला बघायला आम्ही इथे येतो.  हा भाग टेकडीच्या इतर भागापेक्षा थोडा वेगळा पण छान वाटतो. उंदिरमारी चा अभाव असलेला आणी खुरट्या झुडपांचा ह्या भागात,  संध्याकाळी सगळीकडे सुंदर पिवळा प्रकाश पसरलेला असतो. सुर्य मावळताना त्याचं छान दर्शन होतं.  

टेकडीच्या ह्या भागात ह्या कवटी 😉बोरांची अनेक छोटी झाडे दिसली

ही अशी कडक बोरं कोणत्या जातीची असतील बरं म्हणुन शोध घेत होतो, तेंव्हा बोरांच्या अनेक जातींची माहीती मिळाली.  







ह्या कडक बोरांना  रानबोरं , घाटबोर, किंवा हाडकी बोर असं म्हणतात. ह्यांच हाडकी बोरं हे नाव जास्त समर्पक वाटलं :-)


http://www.flowersofindia.net/catalog/slides/Kath%20Ber.html

Botanical name: Ziziphus xylopyrus  Ziziphus caracutta


Thursday, 28 January 2021

कांडोळ / कुलू / भुत्या / gum karaya

    टेकडीवरच्या एका झाडाने बरेच दिवस आम्हाला कोड्यात पाडलं होतं. तीन – चार फूट उंचीच्या या रोपट्याची पानं त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे एकदम नजरेत भरण्यासारखी. पण तरी याची ओळख काही पटत नव्हती. आणि अचानक याचं नाव कळलं ... कुलू / कांडोळ / गम कराया.

पांढरं शुभ्र, गुळागुळीत, रात्री उठून दिसणारं खोड हे या झाडाचं वैशिष्ट्य. या खोडामुळेच याला भुत्या किंवा ‘घोस्ट ट्री’ असंही नाव आहे.   

Sterculia urens हे या झाडांचं शास्त्रीय नाव. स्टर्क्युलिया म्हणजे शेण किंवा विष्ठेचा दुर्गंध असणारा. याची फुलं आणि फळं हे नाव सार्थ ठरवतात. डिसेंबर – जानेवारीमध्ये याला फुलं येतात, आणि मार्चपासून हिरवी पोपटी पाच पाकळ्यांच्या मोठ्या फुलासारखी दिसणारी फळं येतात. जून झाल्यावर ही फळं लालसर जांभळी दिसतात. त्यावरचे केस हे खजकुइलीसारखेच खाजरे असतात. शरदिनी डहाणूकरांच्या ‘हिरवाई’ पुस्तकात असा उल्लेखअआहे, की या फळातल्या बिया खाता येतात. (दुर्गंध असणारच, तरीही खातात?)   

या झाडाचा डिंक म्हणजे गम कराया. हा पोटाच्या विकारावर औषधी असतो. औषधनिर्मिती उद्योगामध्येही हा डिंक वापरला जातो.


 



Wednesday, 20 January 2021

Dioscorea bulbifera डुक्कर कंद /Dioscorea alata उंदियोचा कंद (Indian purple yam)

मराठी नाव: कडु कांद / करणफळ / डुक्कर कंद 


Botanical name: Dioscorea bulbifera 


Common name: Aerial yam, Air potato, Air yam, Bitter yam


अधिक माहितीसाठी: 

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Air%20Yam.html

https://en.wikipedia.org/wiki/Dioscorea_bulbifera


ह्या कंद वर्गात खुप गोंधळ उडतो, कारण Dioscorea ह्या कंद वर्गात बर्‍याच जाती अहेत.   Dioscorea alata आणि Dioscorea.bulbifera ह्यात तर खुप साधर्म्य वाटते. 

टेकडीवर जो वेल पावसाळ्यात पाहिला तो हा आहे. पावसाळ्यात ह्याची पाने अजस्त्र झाली होती.










आणि ह्या वेलाला पानांखाली असे लहान कंद/  (air pototoes) लगडलेली दिसली.  तसेच ह्या वेलाला जमिनीखाली पण मोठे कंद असतात.








हा bulbifera चा कंद विषारी आहे असे बर्‍याच ठिकाणी वाचलं. पण विषारी म्हणजे हा कंद आपण कच्चा खाऊ शकत नाही. आपल्या सह्याद्रीच्या घाटात अनेक आदिवासी ह्याची सुंदर भाजी करतात असा उल्लेख काही पुस्तकांमध्ये वाचला. आदिवासी जमाती हा कंद वाहत्या झर्‍यांमध्ये/ पाण्यामध्ये टाकुन ठेवतात, व दुसर्‍या दिवशी ह्याची छान उकडुन भाजी करतात. त्यामुळे विष म्हणजे आपल्याला पचायला कठिण असलेल्या प्रथिनांवर प्रक्रिया होऊन (detoxification) ती खाण्यायोग्य बनवतात. असे महाराष्ट्रात बरेच शक्तीवर्धक कंद आपले पुर्वज खात होते,  ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहचले नाही याचे दुःख  वाटते. 


आयुर्वेदात कंदाचे  कैक उपयोग आहेत. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे खुप पौष्टिक असल्याने हा बलवर्धक कंद आहे. एकदा खाल्यावर बर्याच वेळ भुक लागत नाही असं बखर रानभाज्यांची ह्या निलीमा जोरवार ह्यांच्या पुस्तकात वाचलं.  जुने लोक लांबच्या प्रवासाला जाण्यापुर्वी ह्याच कंदाला उकडुन सोबत घेउन जात असत असे वाचले.





हिवाळ्यात एका वेलावर पाहिलेले हे असे  घोस डुक्करकंदाचेच होते का?? ते शोधतेय सध्या. पण नक्कीच Dioscorea च्या कोणत्या तरी जातीचे असावेत.

फळाच्या आकारावरुन ते Dioscorea oppositifolia चे असावेत असा अंदाज वाटतोय.






पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर ह्या वेलाच्या पानांचा आकारामध्ये खुप फरक असतो.



http://tropical.theferns.info/viewtropical.php?id=Dioscorea+bulbifera

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5306286/


एकदा एखादी गोष्ट माहित पडली कि जळीस्तळी तिच दिसते. तसंच हा दुर्मीळ  / फक्त जंगलात दिसणारा  वेल  आमच्या सोसायटीच्या वाफ्यात ठिकठिकाणी आलेला दिसला. टेकडीसारखी अजस्र पाने नव्हती पण याचे हवेतले छोटे कंद/ बटाटे मात्र लटकलेले दिसले. दोन दिवसांनी तर गार्डन मध्ये याची शेतीच बघितली. हा वेल खुप सावलीच्या ठिकाणी वेड्यासारखा वाढतो व त्याच्या गर्द सावलीमुळे जवळपासच्या झाडांना नीट येवु देत नाही असेहि वाचले. 




Dioscorea alata :


हा वेल विज्ञान आश्रम मध्ये आहे. 

ह्याला Indian Purple Yam असेही म्हणतात, म्हणजेच ह्या वेलाच्या मुळाला जो मोठा कंद असतो तो उंदियो मध्ये वापरतात. बर्‍याच वेळा हा cultivated असतो


पाने जराशी वेगळी आहेत, आणि वेलाला लागडलेले कंद पण आकाराने खुप वेगळे आहेत.










ह्याच्या फुलांकडे कधी लक्ष गेलं नाही पण ह्या वर्षी लक्ष ठेवु.


Dr. Almeida ह्यांनी त्यांच्या flowers of maharashtra ह्या पुस्तकात हे दोन वेल वाढताना एक  clockwise आणि दुसरा anticlockwise वाढतो असे म्हटले आहे. वेंलामध्ये वर जाताना असा काही दिशादर्शक फ़रक असतो असं माहीत नव्हतं ,पुढच्या वेळी जावु तंव्हा नीट निरखुन पाहिलं पाहिजे.


Monday, 18 January 2021

म्हतोबावरचे पक्षी

 पक्षी बघायला त्यांच्याबद्दल जाणुन घ्यायला हल्लीच सुरवात केलीय.  त्यांच्याबद्दल जे काही दिसतय ते लिहायचा प्रयत्न इथे करतो आहोत.



१७/०१/२१


Indian Roller निलपंख :


हा पक्षी फारच ओळखीचा झाला आहे आता आमच्या..हल्ली म्हणजे हिवाळा सुरु झालाय तेंव्हापासुन नेहमी दिसतो टेकडीवर, त्याच्या ठराविक जागा आहेत तीथेच. भारतीय असला तरीही कायम नसतो. म्हणुन पाहुणा आहे तो म्हातोबाचा. म्हणुनच कि काय पण नेहमी बिचार्‍याशी कोणी ना कोणी भांडत असतं. मागच्या रवीवारी खंड्या सोबत भांडण चालु होतं, ते बघताना मजा वाटली, छोटा निलपंख मोठ्या निलपंखामागे लागल्याचा आधी भास झाला. कधी कावळा तर कधी कोतवाल कोणाशीतरी पंगा असतोच ह्याचा, असं का असेल बरं???  आंतर्राज्यातील लोकांमध्ये जसा जागेवरुन कायम वाद असतो तसं प्रकरण वाटतय हे...


 

Yellow eyed babbler

 

सहा सात पक्ष्याच्या टोळीने फ़िरणारे हे पक्षी आज  साडे ९ च्या सुमाराला म्हातोबा टेकडीवर दिसले.

सातभाई अनेक वेळा पाहिले आहेत, पण ह्यांना पाहुन हे सातभाईचेच भाई आहेत असं कहीच वाटलं नाही,  Priniya असावेत का??   पक्षीमित्र धर्मराज ने सांगितलं ह्यांच नाव Yellow eyed babbler. म्हणजे हे पिवळ्या डोळ्यांचे सातभाई :-)..पण ह्याच्या डोळ्यांभोवती पिवळा नाही तर फिकट लालसर नारंगी रंग दिसतोय.

https://ebird.org/species/yeebab1?siteLanguage=en_IN


 आणि  वरच हे वर्णन वाचुन कळलं सगळ्या पक्ष्यांचे थोडे थोडे गुणधर्म घेतलेत ह्याने.




रोज आकाशात घारी तर पहात असतोच, आज एक अलभ्य लाभ झाला. म्हातोबाच्या मंदिराजवळ पोहोचलो  तेंव्हा घारीएवढाच एक शुभ्र पक्षी खुल्या आसमंतात घिरट्या घालत होता. आम्ही पक्ष्याला नीट निरखुन पहाण्यासाठी जसजसं पुढे येत होतो तसतसा तो लांब घिरट्या मारु लागला. आणि आमच्या पासुन दुरवर forest च्या भिंतीच्या आत एका कडुलींबाच्या झाडावर जावुन बसला. 



आणि नंतर थोड्या वेळासाठी गायब झाला. आणि पुन्हा घिरट्या मारताना दिसला,  आता पक्षाने एक अजब प्रात्यक्षिक करुन दाखवले. उंच आकाशात एकाच जागेवर चक्क १५/२० सेकंद Hovering करत राहिला. तो ज्या ठिकाणी hovering करत होता,  थोड्यावेळाने आम्हाला तीथे swift किंवा swallow पक्ष्यांचा थवा आढळला. 

घरी आल्यावर पक्ष्याचं नाव आणि त्यांच्या सवयी जाणुन घेतल्यावर hovering करण्याची त्याची कला कळुन चुकली. तो पक्षी होता कापशी घार, म्हणजेच black winged kite. 

https://ebird.org/species/bkskit1?siteLanguage=en_IN



अमीत ने सांगीतलं होतं आपल्या टेकडीवर Eurassian Sparrow hawk दिसतोय सध्या , म्हणुन नेहमी हा पक्षी दिसला की आम्ही ह्यालाच ESH म्हणायचो.

नवर्याच्या मित्राचा कॅमेरा घेतला अभ्यासांकरता.. आता कळला फरक दोघांमधला, हा ESH नसुन kestrel आहे. 

दुर्बीण आणि कॅमेरा घेतल्यापासुन खुप पक्षी दिसत आहेत टेकडीवर, जे आज्पर्यंत का दिसले नाहीत :-)



कसा मान वळवुन पाहतोय आमच्याकडेच..



Tree Pipit