Friday, 8 September 2017

टेकडी कुणाची?

 परवा आमची टेकडी अगदी फोटोसकट पेपरात झळकली. चुकीच्या कारणासाठी – तिथे फिरायला गेलेल्या एका बाईंचा मोबाईल आणि साखळी चोरट्यांनी हिसकावून घेतली म्हणून. त्या तिथे नियमित फिरायला जाणार्‍यातल्या होत्या. वेळही सोमवारी संध्याकाळी सहा ते सातच्या मधली, म्हणजे शनिवार – रविवार पेक्षा कमी, पण थोडीफार वर्दळीचीच. चोरांचा माग लागला, चोरलेला मालही पोलिसांना परत मिळाला.

चोरांपैकी एक मोठा, बाकी सगळे कायद्याच्या मते अज्ञान. हा मोठा चोर टेकडीजवळच्या झोपडपट्टीत राहणाराच.  योगायोगाने माझ्या कामाच्या बाईच्या ओळखीतला. (त्याच दिवशी संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला माझ्या बाईला भेटलाही होता वस्तीत.) साधारण २३ वर्षं वय. आई धुणीभांडी करते, बाप रोजंदारीवर मिळेल ते काम करतो. हा घरातला मोठा मुलगा. अजून लहान बहीण आणि भाऊ आहेत, ते शिकताहेत. हा काहीही कामधाम करत नाही. यापूर्वीही त्याने असले उद्योग केलेत, हे माहित वस्तीत सगळ्यांना माहित आहे. चोर्‍यामार्‍या करायच्या, पोलीस आलेच तर वस्तीमागच्या टेकडीवरच्या रानातून पसार व्हायचं. टेकडीवर बसून दारू ढोसायची असले याचे उद्योग. याच्याकडे एखादा सुरासुद्धा असायचा कधीमधी. त्यामुळे कुणी त्याच्या वाटेला जायचं नाही. आपल्या पोरांना असली संगत नको म्हणून त्याला लोक फारसे आपल्या भागात येऊ द्यायचे नाहीत. माझ्या बाईंचा नवरा तर संध्याकाळी सहानंतर त्यांच्या मुलग्यांना सुद्धा घराबाहेर पडू देत नाही!
चोरीची तक्रार नोंदवल्याबरोबर लगेच पोलीस वस्तीत आले. पोलिसांना चुकवायला हा दुसरीकडे पळून गेला. तिथेही पोलीस मागावर आलेत म्हटल्यावर उंच इमारतीवरून ड्रेनेजच्या पाईपला धरून उतरण्याच्या प्रयत्नात हा खाली पडला. ससूनला ऍडमिट केलंय, पाठीला जबरदस्त मार लागलाय, बहुतेक दोन्ही पाय लुळे राहणार आता आयुष्यभर. पोलीस – न्यायालय काय शिक्षा देतील तेंव्हा देतील, पण पोराला वाटेल तसा बहकू दिल्याची शिक्षा आईबापांना भोगावी लागणार त्याला आयुष्यभर पोसून. 

बाकी सगळं जैसे थे होईल हळुहळू. म्हणजे याचे साथीदार - मित्र कदाचित थोडे दिवस जरा दबून राहतील पोलिसांना. वस्तीतल्या मुलींना जपणारे, त्यांची लवकरात लवकर लग्नं लावून "जबाबदारीतून मोकळे होणारे" आईबाप पुन्हा या पोरांच्या गुंडगिरीकडे काणाडोळा करणार. अर्धवट शिकलेल्या पोरांना बापासारखी मजूरी करायला लाज वाटणार, दुसरं मनासारखं काम क्वचितच सापडणार. नाहीतर ते पुन्हा इकडेच वळणार.
या झोपडपट्टीच्या जवळ मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आहेत. तिथे गाड्या धुणं, सिक्युरिटी अशी थोडीफार कामं या वस्तीतली मुलं करतात. बरीच मुलं रिक्षाही चालवतात. इव्हेंट मॅनेजमेंट, भंगारचा धंदा अशी कामंही करतात. पण आईबापाच्या पैशावर गुंडगिरी करणारी मुलंही इथे भरपूर आहेत. वस्तीवर लक्ष ठेवायला पोलिसांनी एक चौकीच केलीय आता जवळ. पण या मुलांशी बोलू शकेल, त्यांना कामाला लावू शकेल असं कुणी मला तरी माहित नाही.

उगाच सुखाचा जीव धोक्यात कशाला घालायचा म्हणून टेकडीवर जाणार्‍या सोसायटीवाल्यांची संख्या रोडावणार, सोसायटीतल्या सोसायटीमध्ये फिरणार्‍यांची वाढणार. यात सगळ्यांचाच तोटा आहे. कायदा पाळणारे जितके कमी लोक टेकडीवर येतील, तेवढी टेकडी जास्त धोक्याची होते. जास्तीत जास्त लोकांनी तिथे येत राहिलं पाहिजे. तिथे जाग रहायला हवी किमान सकाळ – संध्याकाळी तरी. फक्त फिरायला येणार्‍यांनी अवेळी, एकट्यानी गच्च झाडीमध्ये शिरणं, महागडे मोबाईल – दागिने मिरवणं यातून चोराला निमंत्रण दिल्यासारखं होतं याचं भान राखायला हवं. (सोमवारी चोरी झाली त्यांनी यापैकी काही करून मुद्दाम चोरी ओढवून घेतली असं म्हणायचं नाही मला, पण खबरदारी घेणं महत्त्वाचं.) वेगवेगळ्या वर्गातली माणसं जिथे एकत्र येतात अशा सुरक्षित सार्वजनिक जागा आपल्या शहरांमध्ये आधीच कमी आहेत. त्या जास्तीत जास्त राखायला हव्यात.  सोसायट्यांमध्ये क्लोज सर्किट टिव्ही बसवून आणि महागातल्या सिक्युरिटी एजन्सी नेमून शहर सुरक्षित बनत नाही, फक्त मोजके सुरक्षित घेटो तयार होतात. आणि शहाणे लोक या घेटोच्या आत जितके जास्त राहतील, तेवढं बाहेरचं शहर जास्त असुरक्षित होतं असं मला वाटतं.





Sunday, 6 August 2017

सदिच्छा!

माऊला टेकडीवर जायला खूप आवडतं, पण सकाळी कधी मी तिला टेकडीवर नेत नाही. सुट्टीच्या दिवशी सकाळी टेकडी म्हणजे माझा एकटीचा वेळ असतो. आपल्या गतीने, इकडची तिकडची झाडं बघत टेकडी चढायची, वर फिरायचं आणि घरी परत यायचं म्हणजे माझ्यासाठी एकदम ध्यान केल्यासारखं असतं. सकाळी मोकळ्या हवेत पाय जितके चालतील तितका डोक्यातल्या कचर्‍याचा निचरा होतो! असं मस्त फिरून परत आल्यावर जे काही वाटतं, त्याला तोड नाही असं माझं मत आहे! अर्थात ही चैन रोज करायला मिळत नाही, फक्त सुट्टीच्या दिवशीच ही संधी मिळते. त्यामुळे हा वेळ कुणाबरोबरही शेयर करायला मी अर्थातच नाखूश असते. अगदी माऊसोबत सुद्धा. माऊला घेऊन मी संध्याकाळी परत एकदा टेकडीवर जाईन, पण सकाळी तिला बरोबर घेणार नाही!

तरीही कुणीतरी वाटेत भेटतं, चार शब्द बोलतं. तितपत तंद्री मोडणं मी चालवून घेते. मागच्या वेळी मात्र गंमत झाली. टेकडीवर नियमित येणारे अगदी रोज, सकाळ – संध्याकाळ येणारेसुद्धा लोक आहेत. त्यातले थोडेफार लोक (माझं आजूबाजूच्या लोकांकडे कधी लक्ष नसतं, तरीही) मला ओळखतात. त्यातले एक आजोबा. खरं तर तरूण आजोबा म्हणायला हवे असे. कारण निवृत्त झालेत, पण उत्साह तरुणासरखा आहे त्यांचा. भलतेच गप्पिष्ट. बरेच वेळा दिसतात, दिसले की दोन शब्द नक्कीच बोलतात. दोन चार वेळा अगदी मला थांबवून सुद्धा गप्पा मारल्यात त्यांनी. खूप कळकळीने बोलतात, त्यांच्या विषयात त्यांना बरंच काही माहित असतं, काही चांगलं व्हावं अशी मनापासून इच्छा असते. तर आज हे आजोबा अगदी चढायला सुरुवात करतानाच भेटले. चालतांना मी फारसं बोलत नाहीच, पण चढताना तर नाहीच नाही. तोंड किंवा पाय एकच काहीतरी चालू शकतं माझं एका वेळी. आजोबांचं स्वगत चालू होतं, मी आपली अगदीच शिष्टपणा वाटू नये इतक्या वेळा एकाक्षरी प्रतिसाद देत होते. टेकडी चढून झाली, पहिल्या बाप्पाचं देऊळ आलं. (टेकडी चढल्याचढल्या हा दिसतो, म्हणून पहिला बाप्पा. माऊने केलेलं बारसं.) अजून पुढे जाऊन खडीसाखरेचा बाप्पा आला (इथे संध्याकाळी प्रसादाला नेहेमी खडीसाखर असते!), पुढे बांबूच्या बेटापाशी पोहोचलो, तिथून तीन वेगवेगळ्या दिशांना रस्ते फुटतात. यांनी पण नेमका माझाच रस्ता निवडला! वाटेतलं मोहाचं झाड आलं आणि गेलं, शेवटी नंदीबैलाच्या बाप्पाला जाऊन पोहोचलो आम्ही. (या बाप्पाच्या समोरच्या जमिनीवर कोळ्यासारख्या दिसणार्‍या नंदीबैल किड्यांची भरपूर घरं असतात. मातीमध्ये छोटा खड्डा करून तिथे हा मातीखाली लपून बसतो. एखादी मुंगी आली, की तिच्या पायानी खड्याच्या कडेची माती आत पडते, आणि झटकन उडी मारून नंदीबैल सावज धरतो. इथे गेलं, की नंदीबैलाच्या खड्ड्यांमध्ये बारीक काडी घालून त्याला बाहेर काढायचं हा माऊचा आणि सखीचा लाडका खेळ आहे. ) तरी आजोबांचं स्वगत काही संपलं नाही!!! वाटेत नभाळी फुलली होती, फालसा(?)ला फळं धरायला लागली होती, रंगीत सुरवंट दिसले, हिरवं पोपटी गवत उन्हात चमकत होतं, अगदी जवळून मोराचे आवाज आले – मी एक दोन वेळा या सगळ्याकडे त्यांचं लक्ष वेधण्याचा क्षीण प्रयत्न केला. (पण ते निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यामुळे इतक्या क्षुद्र distractions मुळे चित्त विचलित होऊ न देता ते तासभर बोलत राहू शकतात.) त्यांचं म्हणणं असं, की टेकडीवर आल्यावर दहा – पंधरा मिनिटं लोकांनी एका ठिकाणी गप्पा मारल्या तर किती मज्जा येईल! वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी एकत्र गप्पा मारून डोक्याला किती खुराक मिळेल! उदाहरणार्थ, “भोसडीच्या!” ही तुम्हा आम्हाला शिवी म्हणून माहित आहे. पण हा म्हणे संस्कृतमधल्या “भोs सदिच्छा!” या अभिवादनाचा अपभ्रंश आहे. हे त्यांना टेकडीवर येणार्‍या एका भाषातज्ञांकडून समजलंय. आजोबा आता टेकडीवर त्यांच्या मित्रांना भेटतांना नेहेमी “भोS सदिच्छा!” म्हणतात!

नंदीबैलाच्या बाप्पाच्या इथे आजोबांना अजून काही स्नेही भेटतात. ते गप्पा मारत थांबतात, मी आल्या वाटेने परत निघते. जातांना ज्या सगळ्यांना धड भेटता न आल्याची चुटपूट लागून राहिली होती, त्या सगळ्या सग्या सोयर्‍यांना मी परतीच्या वाटेवर निवांत भेटते. तरीही, आजचा चालण्यातला निम्मा वेळ आजोबांनी खाऊन टाकल्याचा सूड मग ब्लॉगवर त्यांचा किस्सा लिहून तरी निघणारच ना! ;)





Sunday, 23 April 2017

पुन्हा एकदा सोन्याच्या फुलांचं झाड



सोनसावर माझी लाडकी. माझा असा समज होता, की या झाडाचा उत्सव असतो जेमतेम दोन – तीन आठवडे, जानेवारी – फेब्रुवारीमध्ये फुलं आल्यावर. एरवी हे झाड विशेष काही बघण्यासारखं नाही. या वर्षी ही फुलं पोटभर बघितली. 

त्या सुंदर फुलांच्या मानाने नंतर येणारी वांग्याच्या आकाराची बोंडं अगदीच बेंगळूर वाटायची मला. पण आज पाहिलं तर ती बोंडं झाडावरच उकलली होती, आणि सोनसावरीचा कापूस झाडांखाली पडला होता. आधी एकदम बोअरिंग दिसणारं बोंड उकलल्यावर एवढं मस्त दिसत होतं! उकलतांना त्याच्या बाहेरच्या तपकिरी सालीच्या पाच पाकळ्या आणि आतल्या ऑफ व्हाईट अवरणाच्याही पाच पाकळ्या झाल्या होत्या. इतकी सुंदर रंगसंगती आणि सुबक आकार! खरंच सोन्याच्या फुलांच्या झाडाला साजेसा. एका आड एक तपकिरी आणि ऑफ व्हाईट पाकळी आणि त्यातून डोकावणारा कापूस अशी ही बोंडं झाडावर लटकत होती.





क्वचित कुठेतरी बोंडाच्या पाकळ्या खाली पडलेल्या दिसल्या.





सोनसावरीची बी तशी मोठी, जरा जड आहे आणि कापसाचे तंतू लहान. त्यामुळे या कापसाच्या म्हातार्‍या वार्‍यावर उडत नव्हत्या, झाडाखालीच पडल्या होत्या. दोन – चार बिया आणल्यात, बघू रुजवता येतात का या पावसाळ्यात!


Sunday, 19 March 2017

महुआ महुआ महका महका ...

काल अचानक या झाडाने मोहात पाडलं ...


    नेहेमीची टेकडी, नेहेमीचीच पायवाट. तरीही तिथे नवं काहीतरी सापडत राहतं! आजुबाजूला बहर संपलेले भुंडे ग्लिरिसिडिया (गिरिपुष्प) आणि वाळलेलं गवत. याही झाडाखाली वाळालेल्या पानांचा खच, झाडावर एकही पान नाही. फक्त कळ्या. खाली झुकलेल्या या कळ्या कसल्या असतील म्हणून मी बघत होते, तर कुणीतरी खुडून तिथेच टाकलेल्या काही डहाळ्या दिसल्या.



दोन्ही डहाळ्यांवर एकेक फुललेलं फूल, बाकी अस्फुट कळ्या. फुलाचा वास बघितला, आणि उडालेच! हे मोहाचं फूल होतं.

मग अजून शोधल्यावर खाली पडलेल्या पानांमध्ये दडलेली अजून काही फुलं सापडली.  


अर्थातच हे फूल चाखून बघितलं. फुलात मध नाही, फुलालाच गुळमट गोड चव होती. (माऊला नाही आवडलं!) दोन फुलं खाल्ल्यावर दिवसभर मला आपल्या अंगाला मोहाच्या फुलांचा वास येतोय हे जाणवत होतं. :) (दिवसभर प्रचंड झोप पण येत होती - पण ती परवा रात्री नीट न झोपल्यामुळे असावी मोहाच्या फुलांमुळे नाही असं मी ठरवलंय. याची खात्री करायला आज परत दोन मोहाची फुलं खाल्लीत त्यामुळे परत एकदा महुआ महुआ महका महका :D)

***

काही झाडं संस्कृतीमध्ये अगदी खोल रुजलेली असतात, लोकांच्या जगण्याचा फार मोठा भाग त्यांनी व्यापलेला असतो. मोहाचं झाड अशा झाडांपैकी एक. मध्य भारतातल्या आदिवासी जीवनात मोहाचं खूप  मोठं स्थान आहे. मोहाची फुलं ते गोळा करतात, खातात, वाळवून त्या पिठाच्या भाकरी करतात, मोहाची दारू बनवतात. कविताताईंनी मोहाच्या पदार्थांविषयी - अगदी पुरणपोळीविषयीसुद्धा लिहिलं होतं त्यांच्या ‘घुमक्कडी’मध्ये. त्या पोस्टमध्येच पहिल्यांदा मोहाच्या फुलांचा फोटो बघितला त्यामुळे काल हे झाड ओळखता आलं. (मला तोवर उगाचच मोहाची फुलं लाल रंगाची असतील असं वाटत होतं.) यापूर्वी मोहाचं झाड पाहिलं होतं ते थंडीच्या दिवसत. तेंव्हा मोहाच्या बहराच्या काळ नसतो, त्यामुळे फुलं बघायला, चाखायला मिळाली नव्हती. सह्याद्रीमध्ये मोहाची झाडं फारशी नाहीत असा माझा समज. त्यामुळे पुण्यातल्या (माझ्या!) टेकडीवर मोहाचं झाड! खूशच झाले मी एकदम. अर्थात रानात या फुलांच्या स्वागताची जशी राजेशाही तयारी होते – झाडाखालची जमीन स्वच्छ करून, तिथे पंचा अंथरून त्यावर आदिवासी फुलं गोळा करतात – ते भाग्य पुण्यातल्या मोहाच्या झाडाला कसं लाभणार? शहरातल्या लोकांना हा मोह ओळखीचा नाही, त्यांना वेगळ्या मोहांच्या मागे धावायचं असतं!



Sunday, 29 January 2017

सोन्याची फुलं

    कधीकधी तुम्हाला कुणाची तरी मनापासून आठवण येते आणि तेंव्हाच त्यांनाही तुमची आठवण येते. टेलिपथी म्हणा. अशा वेळी तुमची भेट झाली तर त्यासारखं सुख नाही. शनिवारी असंच झालं. टेकडीवरच्या सोनसावरीची आठवण झाली अचानक. तिला भेटावंसं वाटलं, पण तिच्या घराचा नेमका पत्ताच आठवेना! पत्ता विसरण्यात मी हुशार आहेच. त्यामुळे वेळ वाया न घालवता सरळ आईला फोन केला. तिने सांगितलेल्या पत्त्यावर गेले, तर तिथे अशी सोन्याच्या फुलांची उधळण चालली होती!!!

सोनसावर किंवा पिवळी सावर. (पिवळी सावर नाव आवडत नाही मला अजिबात. ही फुलं सोन्याचीच. त्यांचा रंग खरंच सोन्यासारखा वाटतो उन्हात.) फारसं उंच नसणारं – बरेचदा झुडूप म्हणावं असंच – झाड. फांद्यांची रचनाही काही काटेसावरीसारखी (लाल शेवरी) नेटकी नाही. फुलं तशी मोजकीच – एकदम सगळं झाड भरलेलं मी तरी बघितलं नाही अजून. काटेसावरीसारखी या झाडावर किडे – माशा – पक्षी अशा सगळ्यांची झुंबड उडालेली दिसत नाही मधासाठी. पण सोनसावरीच्या एकेका फुलाने मला वेडं केलंय. फुलाचा रंग म्हणजे सोन्याचा धमक पिवळा! उतरत्या उन्हात न्हायलेली अशी फुलं बघणं म्हणजे मेजवानी. आजुबाजूची सगळी झाडं पानं टाकून बोडकी. पायथ्याचं गवतही सुकलेलं. काळी माती, सुकलेलं गवत, आणि त्यावर उठून दिसणारी ही झाडाखाली पडलेली सोन्याची फुलं! अजून थोडी झाडाच्या शेंड्यावर, कुठे एखादं शेजारच्या झुडुपाच्या काट्यात अडकलेलं. पहिलं झाड दिसलं, मग दुसरं, मग मला सगळीकडे सोनसावरीची झाडंच दिसायला लागली!






    इतक्या वर्षांपासून ही टेकडी तशी ओळखीची आहे. सोनसावरीचं एखादं झाड, त्यावर फुललेलं एखादंच फुल बघितलं होतं आतापर्यंत. पण इथेच दुसर्या बाजूला एवढी सोनसावरीची झाडं आहेत, त्या झाडांखाली असा फुलांचा सडा पडतो हे नवल बघायला परवाचा शनिवारच यावा लागला. माऊने आणि मी वेड्यासारखी फुलं वेचली. माऊने तर वाटेत भेटलेल्या कुणाकुणाला ती वाटलीही. मग घरी आईला आणून दाखवली फुलं.

    रविवारी सकाळी माझ्या नेहेमीच्या टेकडीवर गेले, तिथलीही सोनसावर फुललेली! आणि आजवर मी तिथे सोनसावरीची दोन – तीन झाडं पाहिली होती, आज मला तिथे सहा तरी झाडं भेटली. इतकी वर्षं कुठे लपून बसली होती ही झाडं काय माहित! रविवारी संध्याकाळी मग परत आई-बाबांना ही झाडं बघायला घेऊन गेले. आज परत अजून नवी झाडं सापडली!!! काही लोकांना स्वप्नात धन दिसतं, ते “मी इथे इथे आहे, मला बाहेर काढा” म्हणतं म्हणे. शनिवारी सोनसावरीने आठवण काढ्ली, आणि तिचा माग काढल्यावर टेकडीवर मला सोन्याची खाण लागली आहे.

Sunday, 13 November 2016

ताजी ताजी सकाळ

   ताज्या ताज्या सकाळी, फिरायला गेल्यावर आज अशी नागमोडी वाट भेटली.


    मग गवतातली गंमत. आधी इथे गवताला भाले फुटतात.:)


    मग त्या भाल्यांची अशी नाजुक सुबक तोरणं होतात. दोन दिवस दिमाखात मिरवतात, मग त्यातली ती पांढरी पदकं जांभळी होतात, कधीतरी अलगद जमिनीवर उतरतात. मी मुद्दलात ते भालेच इतकी वर्षं बघितलेले नव्हते, मग पुढची ही गंमत कळणार कशी?





    वाटेवरून जातांना एक पाऊलसुद्धा वाकडं न टाकता जरा डोळे उघडे ठेवल्यावर ताजे ताजे पंख सुकवत बसलेली फुलपाखरं भेटली –


याने तर फसवलंच ... त्याचा खोटा डोळा आणि खोट्या मिश्याच आधी खर्‍या वाटल्या होत्या मला!


मोर दिसला नाही पण एक पीस ठेवून गेला होता आमच्यासाठी :)


 ***
    तशा मला वेगवेगळ्या गोष्टी करायला, अनुभवायला आवडतात. पण मला बरं वाटण्यासाठी रोज मी नव्या देशात, नव्या शहरातच (खरं तर नव्या डोंगरावरच) डोळे उघडयला हवेत असं नाही. फक्त डोळे उघडल्यावर नवा थरार अनुभवायला मिळाला पाहिजे एवढं खरं. याला आत्मसंतुष्टता म्हणायचं का?का हे अंथरूण पाहून पाय पसरण्याचं गोड नाव आहे ? महत्त्वाकांक्षेचा आभाव आहे का हा? (खरं म्हणजे आहेच. पण त्याला इलाज नाही. माझं असच्चे!) रोजच्याच आयुष्यात नव्याने गोष्टी दिसणं, नवे अनुभव येणं – being able to see things in new light is the high I yearn for. म्हणजे तुम्ही जगभर हिंडलात, पण मिळाणारे अनुभव टिपून घेऊच शकला नाहीत, तर त्या फिरण्याला काय अर्थ? तर जगभर भटकायचं कधी जमेल ते बघू (पैशे???), पण सध्या दिसतंय ते बघण्याचा सराव करायला काय हरकत आहे म्हणते मी.

    या “बघण्याच्या सरावाची” गुरू म्हणजे हायडी. हायडी मला फार आवडते, कारण तिची नजर मेलेली नाही. रोज सूर्य उगवतांना – मावळतांना बघूनसुद्धा तिला त्याचं अजीर्ण झालेलं नाही. म्हणून रोज ती “त्यात काय बघायचंय?” म्हणत नाही, ती

    “The wonder of the moment
    To be alive, to feel the sun that follows every rain”

    अनुभवू शकते. आपल्या भवतालच्या गोष्टी आपण इतक्या गृहित धरत असतो, की त्यांचं असणं - सुंदर असणं - दुर्मीळ असणं - त्यातलं नाट्य वगैरे गोष्टी आपल्याला जाणवतही नाहीत. बघायला कसं शिकायचं?






Sunday, 3 July 2016

हातचा

टेकडीवर जायची एकदा चटक लागली, म्हणजे भर पावसात, वर चिखल असेल हे माहित असताना सुद्धा जावंच लागतं तुम्हाला! तर असंच काल सकाळी रेनकोट – छत्रीसकट टेकडीवर निघाले. परवापासून एकदाचा पाऊस मनापासून बरसायला लागला होता, आणि लगेचच रस्त्यात तळी झालेली होती. रस्त्यातली सरोवरं, ओढे, कारंजी आणि गर्ता पार करत टेकडीच्या पायथ्याशी पोहोचले तर तिथे दोन उत्साही टेकडीवीर गाडीतून रोपं उतरवत होते.

“वर चाललाय ना? एक रोप घेऊन जाल का मॅडम वर?”

“हो! कुठे लावायचीत ही झाडं?”

“वर खड्डे केलेत आम्ही, आता रोपं न्यायचीत. वर मारुतीपाशी ठेवा!”

टेकडी चढणार्‍या  प्रत्येकाकडे त्यांनी असंच एक एक रोप दिलं वर न्यायला. तसंही आज टेकडीवर फिरता येणार नव्हतं, चांगलाच चिखल होता. अजून एखादं रोप वर पोहोचवता आलं तर बघावं म्हणून मी लगेच खाली उतरले, तर तोवर सगळी रोपं वर पोहोचली सुद्धा!

मला हिशोब किंवा कामाचं नियोजन अर्धवट करायला आवडत नाही. म्हणजे गावाला जायचं असलं तर नेण्याच्या वस्तूंची यादी, कामांची यादी केल्याशिवाय (आणि ती टिक केल्याशिवाय - कोण मोनिका मोनिका ओरडतंय रे तिकडं?! ;) ) मला पुढचं काही करताच येत नाही. ही झाडं मी टेकडीवर लावणार असते तर माझ्या नियोजनामध्ये पंचवीस रोपं वर पोहोचवण्याच्या पंचवीस खेपा, तीन माणसं, अर्धा तास वेळ असं काहीतरी आलं असतं. या तीन माणसांकडे उत्सुकतेने बघणार्‍या तिथल्या पंधरांना हिशोबात धरणं माझ्या डोक्यातही आलं नसतं. नीट ‘हातचा’ धरून हिशोब करायला मी कधी शिकणार कोण जाणे!